शिवाजी महाराजांचे राज्य आजही आदर्शवत – प्रा. डॉ. काशिलिंग गावडे
ठाणे : शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला नाही. सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे स्वराज्य हे केवळ एका जातीचे, घराण्याचे नव्हते तर ते जनसामान्यांचे राज्य होते असे मत प्रा. डॉ. काशीलिंग गावडे यांनी व्यक्त केले. ते पाडळी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिद्धार्थ युवा फाउंडेशन व शेतकरी मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी पाडळी च्या सरपंच मीना कांबळे उपस्थित होत्या.
गावडे पुढे म्हणाले की शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षाची गुलामगिरी नष्ट केली. त्यांनी रयतेत धैर्य, शौर्य व आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या राज्यात शेतकरी, बारा बलुतेदार, स्थानिक उद्योगधंदे यांच्या हिताची भूमिका घेतली गेली. रयतेच्या भाजीच्या देटाला, स्त्रीच्या केसाला आणि प्रार्थना स्थळांना धक्का लागता कामा नये ही त्यांची भूमिका होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ध्येयधोरणे ही आजही आदर्शवत आहेत अध्यक्षा मीना कांबळे म्हणाल्या की शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात स्त्रियांचा केलेला आदर व रयतेची घेतलेली काळजी खूप महत्वपूर्ण आहे. या कार्यक्रमात मध्ये आदिती पाटील हिने शिवचरित्राविषयी प्रभावी भाषण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता कांबळे यांनी केले. तर आभार मा.समाधान कांबळे व सूत्रसंचालन आणि संयोजन डॉ. सुनील पाटील यांनी केले. या शिवजयंतीसाठी पाडळी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *