सुरेश प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ध्येयधुंद’ पुस्तकाचा सोहळा संपन्न
सुरेश प्रभू यांच्या ‘ध्येयधुंद’ पुस्तकाची संस्कृत आवृत्ती लवकरच
वर्धमान श्रुतगंगा ट्रस्टचे अध्यक्ष संजय शाह यांची घोषणा
मुंबई :“माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीकडून इतकी कामे कशी घडून येतात, असा विचार मी नेहमी करत असतो. तेव्हा जाणवते की कुठेतरी एक दैवी शक्ती असते, जी आपल्याकडून चांगली कामे करून घेते. त्यामुळे चला, आपण सर्वांनी मिळून समाजाभिमुख कार्य करूया; त्या वेळी ती दैवी शक्ती निश्चितच आपल्या पाठीशी उभी राहील,” असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. नकुल पार्सेकर लिखित आणि सुरेश प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाचा भव्य लोकार्पण सोहळा शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी प्रभू यांनी आपल्या आतापर्यंतच्या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट प्रफुल्ल छाजेड, कालानिर्णयचे कार्यकारी संचालक जयराज सालगांवकर, नाबार्डचे संचालक सतीश मराठे, शैलेश हरिभक्ती, जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश साम्ब्रे, स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे, जय अल्पसंख्यक ट्रस्टच्या अल्पा शाह तसेच वर्धमान श्रुतगंगा ट्रस्टचे अध्यक्ष संजय शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भूषवले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
गौतम ठाकूर यांनी आपल्या भाषणात सुरेश प्रभू यांच्या निर्णयक्षमतेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे सारस्वत बँकेची मोठी प्रगती झाल्याचे सांगितले. रविंद्र चव्हाण यांनी प्रभूंना “परिस” अशी उपमा देत त्यांच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रांना नवी दिशा मिळाल्याचे नमूद केले. सर्व मान्यवरांनी एकमताने सांगितले की, सुरेश प्रभू यांनी कधीही स्वतःचा किंवा आपल्या कार्याचा प्रचार केला नाही आणि ते खऱ्या अर्थाने जागतिक दृष्टिकोन असलेले नेते आहेत. पुस्तकाचे लेखक नकुल पार्सेकर यांनीही प्रभू यांची कार्यकर्ते म्हणून असलेली ओळख त्यांच्या ऑक्सफर्ड पदवीपेक्षाही मोठी असल्याचे नमूद केले.
‘ध्येयधुंद’ पुस्तकाचे सहप्रकाशक म्हणून बोलताना वर्धमान श्रुतगंगा ट्रस्टचे अध्यक्ष संजय शाह म्हणाले की, श्री वर्धमान श्रुतगंगा ट्रस्टसाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आहे, कारण देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एका महान व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास पुस्तकाच्या रूपाने जगासमोर मांडण्याची संधी मिळाली आहे. यासाठी त्यांनी लेखक नकुलजी पार्सेकर यांचे आभार मानले.
ते पुढे म्हणाले की, सुरेशजींनी जैन समाजासाठी मोठे कार्य केले असूनही त्याचे श्रेय कधी घेतले नाही. त्यामुळे या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा एकदा सुरेशजींशी जोडले जाण्याचा आनंद मिळत आहे. राजकारणातील आदर्शवाद कमी होत असताना सुरेश प्रभू आदर्श राजकारण आणि विकासाभिमुख समाजकारणाच्या मार्गावर ठामपणे पुढे जात आहेत, असेही शाह यांनी नमूद केले. स्वामीराज प्रकाशन ही प्रकाशन क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था असून मराठी भाषेसाठी त्यांचा सुरू असलेला अभियान स्वागतार्ह आहे. भाषा कोणतीही असो, ती जिवंत राहिली पाहिजे, हा आमचाही आग्रह आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी संजय शाह यांनी विशेष घोषणा करत ‘ध्येयधुंद’ पुस्तकाची संस्कृत आवृत्ती लवकरच प्रकाशित करण्यात येईल, असे सांगितले. प्रभू आणि लेखक यांची औपचारिक परवानगी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. मराठी आवृत्तीनंतर पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीही लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक परब यांनी केले, तर मोहन होडावडेकर यांनी स्वागत समितीच्या वतीने आभार प्रदर्शन केले. गानचंद्रिका पद्मजा फेणाणी, डॉ. संजय देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *