येत्या काळात बुलियन मार्केटमधील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदार महागाई, सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आणि फेडरल रिझर्व्ह धोरणे यासारख्या प्रमुख अमेरिकन आर्थिक डेटावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तज्ज्ञांच्या मते, व्यापारी संभाव्य व्याजदर कपातीची वेळ आणि गती समजून घेण्यासाठी अमेरिकेतील कामगार डेटा, फेडरल ओपन मार्केट कमिटी (एफओएमसी) बैठकीचे इतिवृत्त आणि फेड अधिकाऱ्यांच्या विधानांचे निरीक्षण करतील.
‌‘जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड‌’चे उपाध्यक्ष (ईबीजी, कमोडिटी आणि करन्सी रिसर्च) प्रणव मीर यांच्या मते सोने आणि चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात; परंतु आगामी अमेरिकन जीडीपी डेटा आणि वैयक्तिक वापर खर्च (पीसीई) महागाईच्या आकडेवारीवर आणि फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांच्या टिप्पण्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे अस्थिरता कायम राहील. देशांतर्गत बाजारात मल्टीकमॉडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वरील चांदीच्या वायदा किमती गेल्या आठवड्यात 5,532 रुपये किंवा 2.2 टक्क्यांनी घसरल्या तर सोन्याच्या किमती 444 रुपये किंवा 0.3 टक्क्यांनी वाढल्या.
सोने आणि चांदी स्वस्त का झाली?
‌‘एंजेल वन‌’चे उपाध्यक्ष (संशोधन, बिगर-कृषी वस्तू आणि चलने) प्रथमेश मल्ल्या यांच्या मते फेब्रुवारी 2026 मध्ये सोन्याच्या किमतीत घट झाली. 13 फेब्रुवारी रोजी प्रति तोळा एक लाख 80 हजार रुपयांच्या उच्चांकावरून सुमारे एक लाख 53 हजार आठशे रुपये प्रति तोळा झाली. अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत असलेल्या अमेरिकन रोजगार आकडेवारीमुळे नजिकच्या काळात व्याजदर कपातीची अपेक्षा कमी झाली आहे. त्याचा परिणाम गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतींवर झाला. भू-राजकीय तणाव आणि नववर्षापूर्वी जोरदार खरेदीमुळे, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षण अबाधित आहे. मंदी आणि तेजीच्या भावनांमधील रस्सीखेच सध्याही सुरू आहे आणि येत्या आठवड्यातही अस्थिरता कायम राहील.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी
आंतरराष्ट्रीय बाजारात, कॉमेक्स सोन्याच्या वायद्यांमध्ये 84 डॉलर किंवा 1.7 टक्क्यांनी वाढ झाली, तर चांदीमध्ये किंचित वाढ झाली. बहुतेक व्यापार सत्रात सोन्याच्या किमतीत चढ-उतार झाले; परंतु परदेशात बाजारात प्रति औंस पाच हजार डॉलर्सच्या वर बंद झाल्या.
मागणीत चढ-उतार
विश्लेषकांचे म्हणणे आहे, की मध्यवर्ती बँकांकडून खरेदी, जागतिक बाजारपेठेत तंत्रज्ञान आणि एआय स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीदरम्यान सुरक्षित-आश्रयस्थानाची भावना आणि डॉलर निर्देशांक कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किमतींना पाठिंबा मिळाला. तथापि, भारत आणि चीनकडून भौतिक मागणीत चढ-उतार, ईटीएफ गुंतवणूकदारांकडून नफावसुली आणि मजबूत अमेरिकन मॅक्रो डेटामुळे तेजी मर्यादित झाली. संपूर्ण आठवड्यात चांदीच्या किमतींमध्येही अस्थिरता दिसून आली, द्वि-मार्गी चढ-उतार आणि कधी कधी उच्च पातळीवर नफा-वसुली झाली. त्यांनी पुढे सांगितले, की औद्योगिक धातूंमध्ये घट आणि प्रमुख तांत्रिक प्रतिकार मोडण्यात अपयशी ठरल्यानंतर नफा-वसुलीमुळे पांढऱ्या धातूवर दबाव आला. तंत्रज्ञान स्टॉकच्या नेतृत्वाखालील जागतिक इक्विटी विक्रीमुळेदेखील दबाव आला. त्यामुळे सर्व मालमत्ता वर्गांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता कमी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *