स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे बिनविरोध
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या महानगरपालिका विशेष सभेत स्थायी समितीवर २६ महानगरपालिका सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली. तर शिक्षण समिती अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात.
स्थायी समिती या वैधानिक समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता २० फेब्रुवारी २०२६ला दुपारी २.०० वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी श्री. प्रभाकर शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी जाहीर केले.
स्थायी समितीच्या सर्व सदस्यांसह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
