आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार देण्यात यावा
बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र व तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघातर्फे साजरी, शासकीय यंत्रणेला मात्र विसर पडल्याचे चित्र
पोंभुर्ले – पत्रकारांचे दैवत तसेच आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २१४ वी जयंती आज २० फेब्रुवारी रोजी पोंभुर्ले येथे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जांभेकर यांचे पोंभुर्ले येथील वंशज सुधाकर रामचंद्र जांभेकर व कुटुंबीय उपस्थित होते. मात्र शासकीय यंत्रणेला पोंभुर्ले येथील स्मारकाच्या ठिकाणी येवून अभिवादन करण्यासाठी विसर पडल्याचे चित्र आज पहावयास मिळाले.
२० फेब्रुवारी रोजी थोर महापुरुष व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची २१४ व्या जयंती निमित्ताने पोंभुर्ले येथे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्याचे शासकीय आदेश आहेत. त्यामुळे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची जयंती शासन पातळीवर सर्वच ठिकाणी साजरी झाली पाहिजे होती. मात्र बाळशास्त्री जांभेकरांच्या मूळ गावी पोंभुर्ले येथे खरं म्हणजे शासनाच्या वतीने अभिवादन झाले पाहिजे होते, मात्र शासनाची यावेळीं उदासीनता दिसून आली. शासनाचा एकही अधिकारी, कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी या थोर महापुरुषांच्या जन्मस्थानी फिरकले देखील नसल्याची खंत जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नारायण पांचाळ यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी हाच दिवस जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्रित आणून जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली होती. दरवर्षी येथे जयंती साजरी करण्यात येईल अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली होती. मात्र यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांना व शासकीय यंत्रणेला याचा विसर पडला अशी भावना जांभेकर कुटुंबीयांनी व्यक्त करुन याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे राज्य सरचिटणीस पत्रकार राजेंद्र साळसकर, खजिनदार सतिश साटम, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार उदय दुधवडकर, सचिव संजय खानविलकर, महाराष्ट्र जर्नालिस्ट युनियनचे सिंधुदुर्ग अध्यक्ष गणेश चव्हाण, सुनिल आचरेकर, बाजीराव जांभेकर, दळवी महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत हाटकर आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते.
पत्रकारितेचे संस्थापक व समाजातील सुविचारांचे व्यासपिठाचे जनक असलेले तसेच समाजाचा आरसा पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा. बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने कोकणात पत्रकारितेचे विद्यापीठ व्हावे. पोंभुर्ले गांवास जागतिक दर्जाचे प्रेक्षणीय व माहिती स्थळ म्हणून मान्यता मिळावी. अशा मागण्या शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष पांचाळ यांनी सांगितले.
फोटो ओळी
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील स्मारकात त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जर्नालिस्ट युनियन महाराष्ट्राचे अध्यक्ष नारायण पांचाळ, राज्य सरचिटणीस राजेंद्र साळसकर, सुधाकर जांभेकर, सतीश साटम, उदय दुधवडकर, संजय खानविलकर, गणेश चव्हाण, बाजीराव जांभेकर, प्रा.प्रशांत हटकर व इतर
