‘आयसीएआय’च्या कल्याण-डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी अमित मोहरे यांची निवड
कल्याण : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या कल्याण-डोंबिवली शाखेच्या वर्ष २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. शाखेच्या अध्यक्षपदी डोंबिवलीकर आणि सीए अमित मोहरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष अमित मोहरे, उपाध्यक्ष प्रदीप मेहता, सचिव अमृता जोशी, कोषाध्यक्ष ईश्वर रोहरा, विकासा अध्यक्ष रोहन पाठक, माजी अध्यक्ष राकेश अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य गिरीश तारवानी, अनुराग गुप्ता आणि विपुल शाह यांचा समावेश आहे.
कल्याण-डोंबिवली शाखेचे कार्यक्षेत्र अतिशय मोठे असून यामध्ये कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, तसेच कर्जत आणि कसारा या भागांचा समावेश होतो. सध्या या शाखेशी ४ हजार ८०० हून अधिक सीए सभासद आणि १३ हजार हून अधिक विद्यार्थी जोडले गेले आहेत. सध्या ही शाखा ५ अभ्यासिका आणि २ आयटी प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून भाड्याच्या जागेतून कार्यरत आहे. मात्र, सभासद आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने लवकरच संस्थेची स्वतःची सुसज्ज इमारत उभी राहणार आहे, अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष सीए अमित मोहरे यांनी दिली. व्यावसायिक पारदर्शकता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक बांधिलकी जपत ही शाखा येणाऱ्या काळात उल्लेखनीय कार्य करेल, असा विश्वास नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.
