कचोरे कोळीवाडा येथील गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ
नगरसेविका रेखा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण : कल्याण ठाकुर्ली समांतर रस्त्यावर असलेल्या कचोरे कोळीवाडा येथील खाडी किनारी गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते आज करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे या विकासकामाला सुरुवात होत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राला मोठा खाडी किनारा लाभला असून काही ठिकाणी गणेश घाट तयार करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. अशाच प्रकारे कचोरे कोळीवाडा येथे असलेल्या खाडी किनाऱ्याचे देखील सुशोभिकरण व्हावे यासाठी नगरसेविका रेखा चौधरी पाठपुरावा करत होत्या. या ठिकाणी सागर देवीचे मंदिर असून गणपती विसर्जन देखील केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिक येत असतात. त्यामुळे या परिसराचे सुशोभिकरण करून कायापालट करण्याची मागणी नागरिकांकडून देखील करण्यात येत होती. त्यानुसार रेखा चौधरी यांनी प्रशासनाकडे, खासदार, आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून या कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे.
त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांनी या कामासाठी तब्बल 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून या खाडी किनाऱ्याचे सुशोभिकरण करून रुपडे पालटणार आहे. आज या सुशोभिकरण कामाचा शुभारंभ आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या कामासाठी स्थानिक नागरिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांचे आभार मानले आहेत.
यावेळी आमदार राजेश मोरे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, बजरंग दल कल्याण जिल्हा संयोजक राजन चौधरी, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष अतिश चौधरी, शिवसेना सचिव संतोष चव्हाण, माजी परिवहन सभापती मनोज चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
