कचोरे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कचोरे परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका जे प्रभाग कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली. हे बांधकाम ठेकेदार यांच्यामार्फत करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पथकाने स्थळावर जाऊन कारवाई केली. आणखी काही ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात येईल.
कारवाईदरम्यान संबंधितांना पुढील काळात कोणतेही अनधिकृत बांधकाम केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (MRTP Act) अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या व मंजूर नकाशा घेणे बंधनकारक आहे. अन्यथा नियमबाह्य बांधकामांवर प्रशासन कठोर कारवाई करेल.
