दिव्यातील ११ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात
अनधिकृत शाळेकडून दहावीचा फॉर्मच न भरल्याचा धक्कादायक प्रकार उघड
दिवा- दिवा पूर्वेतील मॉडर्न वर्ल्ड इंग्लीश स्कूल, दिवा या अनधिकृत शाळेच्या गंभीर निष्काळजीपणामुळे दहावीतील अकरा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांचा दहावी बोर्ड परीक्षेचा फॉर्मच भरला गेला नसल्याचे समोर आल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सदर शाळेत साहील शाह, शिवम बिंद, सपना हलवाई, आयुष पटवा, अनुक्षा सिंग, साहिल वलावटे, रिया कनोजिया, कृष्णा सोनावणे, सोनी कोरी, सपना राम आणि सगुन जैस्वाल हे अकरा विद्यार्थी दहावीत शिक्षण घेत आहेत. वर्षभर अभ्यास करूनही शाळेच्या हलगर्जीपणामुळे त्यांना परीक्षेला बसता आले नाही. शाळेने फॉर्म न भरल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. संतप्त पालकांनी दिवा पोलीस चौकीत धाव घेतली. मात्र, तेथे तक्रार नोंदवून घेण्याऐवजी त्यांना मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जाण्याचे सांगण्यात आल्याचे पालकांनी नमूद केले.
दिव्यात गेल्या काही वर्षांत अनधिकृत शाळांची संख्या वाढताना दिसत असून त्यांच्यावर शासकीय नियंत्रण नसल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे. माध्यमिक विभागाच्या देवीदास महाजन या शिक्षणाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळेच अशा दिव्यातील अनधिकृत शाळांना आळा बसत नसल्याची टीका पालकांकडून होत आहे. गेली तीन ते चार वर्षे दिव्यातील अनधिकृत शाळांचा प्रश्न चर्चेत असला तरी त्यावर ठोस कारवाई झालेली नाही, असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, संबंधित शाळेकडून विद्यार्थ्यांना जूनमधील परीक्षेला बसवण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, नियमानुसार मार्चमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाच जूनमध्ये पुनर्परीक्षेला बसण्याची संधी मिळते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे एक संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत शाळेच्या ट्रस्टी व प्रशासनावर कठोर कारवाई करावी तसेच दिव्यातील अनधिकृत शाळा कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात, अशी मागणी संतप्त पालकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *