१३४ औद्योगिक भूखंडांवरील उद्योग बंद
विहित कालावधीत उत्पादन न झाल्यास भूखंड ताब्यात घेणार
कल्याण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत उद्योजकांना औद्योगिक विकासाच्या उद्देशाने विकसित भूखंडांचे वाटप करण्यात येते. सदर भूखंड धारकांनी करारातील अटी व शर्तीप्रमाणे विहित कालावधीत आवश्यक परवानग्या प्राप्त करून उद्योग सुरू करणे व प्रत्यक्ष उत्पादनात जाणे बंधनकारक असते.
या अनुषंगाने, प्रादेशिक कार्यालय, ठाणे–२ यांच्या पथकाकडून अंबरनाथ, कल्याण, भिवंडी व मुरबाड तालुक्यांतील अंतर्गत औद्योगिक क्षेत्रामध्ये पाहणी व सर्वेक्षण करण्यात आले. या पाहणीअंती एकूण १३४ भूखंडांवरील उद्योग बंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित भूखंड धारकांनी अद्यापपर्यंत आवश्यक शासकीय परवानग्या प्राप्त करून उद्योग सुरू केलेला नाही किंवा उत्पादन प्रक्रिया सुरू केलेली नाही, असे आढळून आले आहे.
करारनामा व लागू नियमांनुसार भूखंडाचा उद्देशपूर्ण वापर न केल्यास किंवा निर्धारित मुदतीत उत्पादन सुरू न केल्यास संबंधित भूखंड ताब्यात घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार, संबंधित भूखंड धारकांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्याची कार्यवाही हाती घेण्यात येत आहे. विहित कालावधीत समाधानकारक खुलासा न मिळाल्यास किंवा उद्योग प्रत्यक्ष सुरू न झाल्यास, संबंधित भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ताब्यात घेणार आहे.
त्यानंतर नियमावलीनुसार व पारदर्शक पद्धतीने सदर भूखंड गरजू व पात्र उद्योजकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या मिलाप पोर्टल वरून ऑनलाइन पद्धतीने पुनर्वाटप करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे औद्योगिक क्षेत्रातील निष्क्रिय भूखंडांचा प्रभावी वापर होऊन स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व औद्योगिक विकासास चालना मिळण्यास मदत होईल, अशी माहिती प्रादेशिक कार्यालय, ठाणे–२ यांच्याकडून देण्यात आली आहे.
