मुंबई : अजित पवार आणि आम्ही कधी एकत्र येऊ असं वाटलंही नव्हतं. कारण दोन्ही पक्ष राजकीय दृष्ट्या एकमेकांच्या विरोधात होते. दोन सकाळ अशा आपण पाहिल्या आहेत ज्यातल्या एका सकाळच्या बातमीने अजित पवारांनी सगळ्यांना धक्का दिला होता. तर दुसऱ्या सकाळच्या अपघाताच्या बातमीने अवघा महाराष्ट्र हळहळला अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पित केली.
आम्ही अनपेक्षितपणे एकत्र आलो. मनात एक अढी होती. मला प्रशासनाचा अनुभव नव्हता मी मुख्यमंत्री म्हणून इथे आलो होतो. मला एक धक्का दिला होता आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बसणार हे मला अनपेक्षित होतं. पण कामकाज सुरु झालं तेव्हा मला कळलं की अजितदादांसारखा उत्तम, दिलदार सहकारी किंवा मित्र मी गमावला आहे.
लॉकडाऊन मध्ये मंत्रालय बंद होतं, अर्थचक्र थांबतं की काय असं वाटत असतानाच महाराष्ट्राचं अर्थचक्र सुरु ठेवलं आणि कुठलीही योजना बंद पडू दिली नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. प्रशासन चालवण्यासाठी जे कसब लागतं ते अजिदादांनी दाखवलं असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
अलिकडच्या काळात अजित पवारांचं वक्तव्य होतं की ज्यांनी त्यांच्यावर ७० हजार कोटींचे घोटाळ्यांचे आरोप केले त्यांच्याबरोबर मी सत्तेत आहे. हे का सांगतोय? कारण माणूस असतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला किती बदनाम करतो. एखाद्यावर किती आरोप करायचे? त्याला आयुष्यातून उठवायचं का? यावर आपण मर्यादा ठेवली पाहिजे. त्यांच्यावर इतके आरोप झाले पण त्यांनी त्या सगळ्या आरोपांना तोंड दिलं. अजित पवार कधीही खचून गेले नाहीत. अजित पवारांच्या कामाचा अनुभव इथे बसलेल्या प्रत्येकाने घेतला आहे. त्यांना अधिकारीही वचकून असायचे. त्यांच्या आवाजात भारदस्तपणा होता, बोलतानाही बिनधास्त बोलायचे. त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांना अडचणींत आणलं आहे हे पण आपण पाहिलं आहे कारण त्यांच्या मनात पाप नसायचं. अजित पवारांच्या जाण्याने दुःखाचा डोंगर हा फक्त पवार कुटुंबावर नाही तर सगळ्या महाराष्ट्रावर कोसळला आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
