आरोग्य केंद्रातील कॅन्टीन इमरती वापराविना पडून

ठाणे: प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या कॅन्टीन इमारती अनेक वर्षे कुलूप बंद अवस्थेत वापराविना पडून आहेत.या कॅन्टीन इमारती भाडे तत्वावर देण्याच्या निविदेअभावी धूळ खात पडून आहेत. आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने ही कॅन्टीन योजना फोल ठरल्याचे दिसून येत आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील गाव पाड्यातील गोरगरीब आदिवासी रुग्णांना स्वस्तात चहा,नाष्टा उपलब्ध व्हावा तसेच शासनालाही भाडे मिळेल या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत सन २०१४ ते २०१५ दरम्यान प्रत्येकी १० लाख रुपये खर्च करून जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या नाविन्य पूर्ण योजनेतून लाखो रुपये खर्च करून कॅन्टीनसाठी इमारती उभारल्या आहेत.शहापूर तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना याचा लाभ झाला आहे.कॅन्टीनसाठी उभारलेल्या या इमारतींना दहा वर्ष होऊनही शासनाकडून या कॅन्टीन भाडे तत्वावर देण्यासाठीच्या निविदाच आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या नसल्याने प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे शासनाची ही योजना फोल ठरल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *