इतिहास धरला वेठिला
शिवाजी महाराजांनी आदिलशाही-मुघल सत्तेविरुद्ध लढून स्वराज्य उभे केले. दुसरीकडे टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. दोघेही वेगवेगळ्या काळातील, वेगळ्या भूभागातील आणि वेगळ्या राजकीय परिस्थितीतील शासक; तरी त्यांची तुलना केली जाते, तेव्हा इतिहासाच्या संदर्भात कमी आणि आजच्या राजकारणाच्या संदर्भात जास्त असते. त्यावरून सत्ताधाऱ्यांनीच कायदा हातात घेणे गंभीर आहे. या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी जणू देशद्रोही भूमिका घेतली, असे मानत भारतीय जनता पक्षाने प्रकरण बरेच ताणले आणि तापवत ठेवले. म्हणूनच सपकाळ यांनी माफी मागूनही या प्रकरणाचे कवित्त्व कायम राहिले.
मतांच्या ध्रुवीकरणाच्या आणि 24 तास राजकारण करण्याच्या नादात संघ परिवार आणि भाजपच्या नेत्यांनी पूर्वी काय भूमिका घेतल्या होत्या आणि आता काय घेतल्या जातात, याचे भान राहिलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि धर्मनिरपेक्ष प्रशासनाचे उदाहरण होते; तर टिपू सुलतान यांच्या कारभारात धार्मिक कट्टरतेची उदाहरणे दिसतात, असे भाजप म्हणतो. काँग्रेसचा प्रतिवाद असा, की टिपू सुलतान यांनी ब्रिटिशांविरुद्ध प्रखर लढा दिला आणि त्यामुळे भारतीय प्रतिकाराच्या इतिहासात त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. दोन्ही पक्षांमधील वाद हा केवळ इतिहासापुरता मर्यादित राहत नाही. तो लगेचच हिंदुत्व विरुद्ध धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय अभिमान विरुद्ध अल्पसंख्याक तुष्टीकरण अशा चौकटीत ढकलला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांनी मुस्लिम सरदारांना पदे दिली, मशिदींचे रक्षण केले, स्त्रियांच्या सन्मानाचे धोरण राबवले. त्यामुळे त्यांना केवळ ‌‘धर्मयोद्धा‌’ म्हणून रंगवणे हे अर्धसत्य ठरते. त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांच्याविषयीही इतिहासात विविध मते आहेत. काही इतिहासकार त्यांना प्रगतिशील सुधारक म्हणतात, तर काही त्यांच्या कठोर धार्मिक धोरणांवर बोट ठेवतात.
शिवाजी महाराजांची तुलना इतर कोणत्याही शासकाशी केली, तर त्यातून भावनिक प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. भाजपने या भावनांना साद घालत काँग्रेसवर ‌‘इतिहासाचा अपमान‌’ केल्याचा आरोप केला. काँग्रेसने मात्र ‌‘तुलना म्हणजे समानता नव्हे‌’ असा युक्तिवाद केला. त्यांच्या मते, दोघांनीही परकीय सत्तेविरुद्ध लढा दिला, एवढाच संदर्भ होता; परंतु मुद्दा असा आहे, की राजकीय नेत्यांनी तुलना करताना शब्दांची निवड बरीच जबाबदारीने करायला हवी, कारण अशा विधानांमुळे समाजात अनावश्यक ध्रुवीकरण वाढते. भाजपसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय अभिमान आणि हिंदू अस्मितेचे प्रतिक आहेत. काँग्रेससाठी टिपू सुलतान हे ‌‘ब्रिटिशविरोधी प्रतिकार‌’ आणि ‌‘धर्मनिरपेक्ष वारसा‌’चे प्रतिक आहेत. दोन्ही पक्ष आपापल्या मतदारवर्गाला साद घालण्यासाठी इतिहासातील व्यक्तिरेखा पुढे करतात. यातून विकास, रोजगार, शिक्षण, शेती आदी कळीचे विषय मागे पडतात. तुलना शास्त्रीय, संशोधनाधारित आणि संदर्भासह केली गेली, तर बौद्धिक चर्चेला चालना देऊ शकते; पण केवळ राजकीय लाभासाठी केली गेली, तर समाजात संशय आणि अविश्वास वाढवते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा सर्वांचा आहे. त्यांचे कर्तृत्व कोणत्याही एका पक्षाची राजकीय मालमत्ता होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांचा इतिहासही अभ्यासाचा विषय आहे, तो केवळ स्तुती किंवा निंदा यापुरता मर्यादित ठेवणे योग्य नाही.
इतिहास हा केवळ भूतकाळाचा दस्तावेज नसतो; तो वर्तमानाच्या आणि भविष्याच्या सामाजिक सलोख्याचा पाया असतो. भारतीय राजकारणामध्ये इतिहास हा अनेकदा ‌‘निवडक स्मृतींचा‌’ खेळ बनतो. एका काळी ज्या व्यक्तीवर टीका केली जाते, त्याच व्यक्तीचे दुसऱ्या प्रसंगी राजकीय सोयीसाठी उदात्तीकरणही केले जाते. भाजपने कर्नाटकमध्ये टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याच्या काँग्रेस सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता; परंतु ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संघर्षात टिपू सुलतान हे महत्त्वाचे नाव आहे, हे इतिहास नाकारू शकत नाही. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध चार अँग्लो-म्हैसूर युद्धे लढली आणि 1799 मध्ये श्रीरंगपट्टणम येथे मृत्यू पत्करला. पूर्वी भाजपकडूनही टिपू सुलतान यांचा उल्लेख ‌‘ब्रिटिशांविरुद्ध लढलेला शूर योद्धा‌’ म्हणून करण्यात आला होता. आता प्रश्न उपस्थित होतो, की ही भूमिका आधीच्या टीकेशी विसंगत नाही का? त्यांच्या धार्मिक धोरणांवर टीका करायची असेल, तर त्यांच्या ब्रिटिशविरोधी लढ्याचे कौतुक का? आणि ते ब्रिटिशांविरुद्ध लढणारे नायक असतील, तर जयंतीला विरोध का? भाजप असो वा काँग्रेस; इतिहासाचा वापर करताना सातत्य आणि प्रामाणिकपणा अपेक्षित आहे. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे गुण आणि दोष मान्य करण्याची प्रामाणिकता राजकारणात क्वचितच दिसते. परिणामी, समाजात संभ्रम निर्माण होतो आणि इतिहासाविषयीचे आकलन अधिकच ध्रुवीकरणाकडे झुकते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागे टिपू यांचे कौतुक करणारे एक पुस्तक प्रकाशित केले होते, त्यात त्यांना देशभक्त म्हटले होते. हे पुस्तक भारत भारती मालिकेचा भाग होते. टिपू यांनी दरबाराची भाषा म्हणून फारसी का वापरली, असा प्रश्न भाजपचे काही लोक करतात. ते हे विसरतात, की त्या वेळी उपखंडात फारसी ही दरबाराची भाषा होती. छत्रपती शिवाजी महाराजही त्यांच्या पत्रव्यवहारात फारसी वापरत होते आणि मौलाना हैदर अली यांना त्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त केले होते. आज ज्याप्रमाणे वर्णन केले जाते, तसे टिपू सुलतान कट्टर धार्मिक नव्हते. त्यांची धोरणे धर्माने प्रेरित नव्हती, असे इतिहासकार सांगतात. कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांना लिहिलेल्या पत्रात ते आचार्यांचा उल्लेख ‌‘जगतगुरू‌’ असा करतात. त्यांनी त्यांच्या मंदिराला भरपूर भेटवस्तूही दान केल्या. पटवर्धनांच्या मराठा सैन्याने शृंगेरी मठ लुटला, तेव्हा टिपू सुलतान यांनी आदरपूर्वक मठाचे वैभव परत मिळवून दिले. त्यांच्या कारकिर्दीत दहा दिवसांचा म्हैसूरचा ‌‘दशहरा उत्सव‌’ हा सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग होता. त्यांनी काही समुदायांचा छळ केला हा आरोप खरा आहे; परंतु या छळाचे कारण धार्मिक नव्हते, तर पूर्णपणे राजकीय होते. या छळाबद्दल इतिहासकार केट ब्रिटलबँक म्हणतात, की हे धार्मिक नव्हे, तर शिक्षेचे धोरण होते. त्यांनी लक्ष्य केलेले समुदाय केवळ हिंदू नव्हते, तर त्यात महदवींसारखे काही मुस्लिम समुदायही होते. शिवरायांनाही स्वकीयांविरुद्ध लढावे लागले होते, हे विसरता येणार नाही.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *