एसएसटी महाविद्यालयात गुरु तेग बहादूरजींच्या शहिदी समागम निमित्त सामूहिक गीत गायन उत्साहात
‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’कडून दखल
कल्याण- शिखांचे नववे गुरू “हिंद दी चादर” परमपूज्य गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त २३ फेब्रुवारी रोजी आयोजित सामूहिक गीत गायन उपक्रमाची ‘ बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस’ कडून विशेष दखल घेतली जाणार असून, या ऐतिहासिक उपक्रमात एस.एस.टी. कला व वाणिज्य महाविद्यालयाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात एनएसएस सह महाविद्यालयाच्या सर्व विभागांतील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गुरु तेग बहादूरजींच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गीताचे सामूहिक सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि बलिदानाची परंपरा जपण्याचा संदेश दिला. कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक-कर्मचारी एकाच वेळी सहभागी झाल्याने हा उपक्रम वैश्विक स्तरावर नोंद घेण्याजोगा ठरला आहे.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा ठाणे जिल्हा एनएसएस समन्वयक प्रा. जीवन विचारे यांनी गुरू तेग बहादुर यांच्या शौर्य आणि त्यागाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ.दीपक गवादे, उपप्राचार्य डॉ. संतोष करमानी, सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.
