कुत्रा चावल्यानंतर रेबिज रिपोर्ट पॉझेटीव्ह आल्याने ३० वर्षीय युवकाची आत्महत्या

कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात कुत्रा चावल्यानंतर रेबिजचा रिपोर्ट पॉझेटीव्ह आल्याने त्यापासुन होणारा त्रास आपल्या आईवडीलांना सहन होणार नाही या भावनेने ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आयेश विश्वनाश अमिन असे या युवकाने नांव असून त्याच्या पश्चात एक भाऊ आणि वृध्द आई वडील असा परिवार आहे. तिसगांव नाक्यावरील सहजीवन सोसायटी मध्ये राहणारा आयेश विश्वनाथ अमीन (३०) असे मृत युवकाचे नाव आहे. तो गेली आठ वर्षांहून अधिक काळ भारत बँक, ठाणे शाखेत नोकरी करत होता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तिसगांव नाका परिसरात एका भटक्या कुत्र्याने आयेश यांच्या पायाला चावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी केवळ एकच इंजेक्शन घेतल्याचे सांगितले जाते. मागील चार दिवसांपासून त्यांच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. दरम्यान, काल सायंकाळी घरात कोणीही नसताना आयेश यांनी आपण आत्महत्या का करीत आहोत याबाबतची सुसाईड नोट लिहून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

या सुसाईड नोट मध्ये ‘आपल्याला रेबिजमुळे जो त्रास होणार आहे तो त्रास आपले आई वडील सहन करू शकणार नाहीत त्यामुळे आपण आत्महत्या करीत असून आपल्या मृत्युस कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये’ असे त्याने नमुद केले असून या सुसाईड नोट सोबत डॉक्टरांचे प्रिशेपशनही जोडले असल्याचे समजते.या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस ठाणे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *