मुंबई : “मीही अपघातात माझी दोन मुले गमावली आहेत. माझे गुरु आनंद दिघे यांनाही अपघातात गमावले. त्यामुळे अपघात अचानक जवळचा कुणी जाणे हे दुःख काय असते, मला ठाऊक आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनाने देवेंद्रजी आणि मी एक मित्र गमावला आहे.”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
“ज्या दिवशी दादा गेले, त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. नियतीसमोर ते हरले. लाखो अनुयायांना ते पोरके करून गेले. अशा शब्दात शिंदेंनी दुख व्यक्त केले.
अजित पवारांच्या कार्यशैलीबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, “प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता आपण गमावला आहे. त्यांच्या हातात फाईल गेली की काय कमी आहे, हे ते लगेच सांगायचे. बैठकीत साधा कागदाचा तुकडा पडला तरी चालत नसे. ते शब्द आणि वेळेला प्रचंड महत्त्व देणारे होते.” कोरोना काळात मंत्रालयात जाऊन काम करणारे ते मोजके नेते होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.
