बिटको रुग्णालयात कोट्यवधींची यंत्रसामग्री धूळ खात!
१५० कोटींच्या रुग्णालयाचा कारभार रामभरोसे?
हरिभाऊ लाखे
नाशिक: येथील बिटको रुग्णालयात कोट्यवधी रुपयांची आधुनिक वैद्यकीय यंत्रणा मागील तीन वर्षांपासून वापराविना धूळ खात पड़न असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेली मॉलिक्युलर लॅब तसेच अत्याधुनिक व्हेंटिलेटर यंत्रणा आणि रक्तपेढी सध्या बंद अवस्थेत असून, याबाबत अस्वच्छता हे मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोना काळात नवीन संसर्गजन्य आजारांचे निदान करण्यासाठी मोठ्या खर्चातून मॉलिक्युलर लॅब उभारण्यात आली होती. त्या काळात या लॅबचा वापर मोठ्या प्रमाणात झाला; मात्र कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर ही लॅब बंद पडली. त्यानंतर कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री आणि व्हेंटिलेटर खाटा देखील निष्क्रिय अवस्थेत पडून आहे.
सरकारने सुमारे १५० कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या या भव्य रुग्णालयाचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय असे नामकरण करण्यात आले. या रुग्णालयात सुसज्ज रक्तपेढी उभारण्यात आली असली, तरी ती अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली नाही. सध्या जुने बिटको रुग्णालयातच रक्तपेढी कार्यरत असून, दरमहा सुमारे ७०० ते ८०० लिटर रक्ताचा पुरवठा रुग्णांना केला जातो.
नव्या रक्तपेढीत रक्त विलगीकरणाची आधुनिक व्यवस्था उपलब्ध असतानाही ती सुरू करण्यात उशीर का होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात सुविधा सुरू होत नसल्यामुळे केवळ श्रेयवादामुळेच कामे रखडली आहेत का, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील हे सरकारी पातळीवरील सर्वात मोठे रुग्णालय असले, तरी काही विभाग अद्याप पूर्णपणे कार्यरत नाहीत.
अनेक रुग्णांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय किंवा वसंतराव पवार मेडिकल हॉस्पिटल येथे हलवावे लागते. रुग्णालय परिसरातील स्वच्छतेबाबतही गंभीर तक्रारी समोर येत आहेत. एमआरआय विभागासमोर ड्रेनेज तुंबल्याने डास व मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती असतानाही अशी परिस्थिती का निर्माण झाली, असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.
