‘माझी वसुंधरा’अभियानात केडीएमसीला प्राप्त झालेला दीड कोटीचा पुरस्कार ही अभिमानास्पद बाब – महापौर हर्षाली चौधरी

कल्याण : माझी वसुंधरा अभियान ५.० (सन २०२४-२५) अमृत गटात कोकण विभागीय स्तरावर कल्याण डोंबिवली महापालिकेला प्राप्त झालेला दीड कोटीचा पुरस्कार ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी आज केले. महापालिकेला या मिळालेल्या पुरस्कारासाठी परिश्रम घेतलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गाच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन आज स्थायी समिती सभागृहात करण्यात आलेले होते. त्यावेळी बोलताना महापौरांनी हे प्रतिपादन केले आणि पुरस्कार प्राप्त अधिकारी, कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.

महानगरपालिका चांगले काम करीत आहे, याची पोचपावती म्हणजे हा पुरस्कार आहे. चांगल्या कामाचे समाधान नक्कीच मिळते, असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या भाषणात काढले. तथापि कचऱ्याची समस्या मोठी आहे, यासाठी कचरा विलगीकरण करणे आवश्यक आहे. मनपा क्षेत्रातील गृहसंकुले, विद्यार्थी, एनजीओ यांच्या मदतीने याबाबतची जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश  त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या समन्वयाने शहराचा विकास पुर्णत्वास जावू शकतो, असे सांगत उप महापौर राहुल दामले यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये राज्यातील ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपला सहभाग दर्शविला होता. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शहरात विविध पर्यावरणपूरक प्रकल्प, व्यापक जनजागृती मोहिमा, नागरीकांचा सक्रीय सहभाग तसेच पर्यावरण संवर्धन व साश्वत विकासासाठी तांत्रिक आणि व्यवहारीक उपयोजनांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यात आली.

त्यामुळे हे यश प्राप्त होण्यासाठी वर्षभर सातत्याने परिश्रम घेतलेले अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) प्रशांत भागवत आणि त्यांचे सहकारी, अतिरिक्त शहर अभियंता (जनि:मनि:) जगदीश कोरे आणि त्यांचे सहकारी, पर्यावरणाचे उपआयुक्त समीर भुमकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे आणि त्यांचे सहकारी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आणि त्यांचे सहकारी, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव आणि त्यांचे सहकारी तसेच कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, मनोज सांगळे, या अभियानाचे शहर समन्वयक गितेश झुंझारराव, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व मनपाच्या सोशल मिडीया टिमचे उमेश यमगर तसेच या अभियानासाठी परिश्रम घेतलेले इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग यांचा महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, उपमहापौर राहुल दामले व उपस्थित शिवसेना गटनेते‍ विश्वनाथ राणे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, काँग्रेस गटनेते कांचन कुलकर्णी, एनसीपी गटनेते रमीज मनीयार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण विभागाचे उपआयुक्त समीर भुमकर आणि सुत्रसंचालन महापालिका सचिव किशोर शेळके यांनी केले. महानगरपालिकेने ऊर्जा संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत महाराष्ट्र शासनाने  “Certificate Of Excellence” हा पुरस्कार महानगरपालिकेला जाहीर केला,  ऊर्जा संवर्धन क्षेत्रात योगदान दिल्याबाबत महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत /यांत्रिकी) प्रशांत भागवत आणि त्यांचे सहकारी यांचा  महापौर, आयुक्त व  उपमहापौर यांच्या हस्ते सन्मानपत्र  व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *