राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा संपन्न
‘मोर्चा’ या कथेस प्रथम क्रमांक तर ज्ञान तेच देव या कथेस द्वितीय क्रमांक
कल्याण : नाट्य रसिकहो कल्याण आयोजित राज्यस्तरीय कथा साहित्य अभिवाचन स्पर्धेत इरसाल स्टोरी टेलर्स, मुंबई यांनी सादर केलेल्या “मोर्चा” या कथेचे अभिवाचन प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. तसेच ज्ञान वैखरी, पुणे या संस्थेने सादर केलेल्या “ज्ञान तेच देव” या कथा अभिवाचनास द्वितीय क्रमांकाचे व प्रायोगिक रंगमंच संघ, मुंबई यांनी सादर केलेल्या “राडा” या कथा अभिवाचनास तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच स्टुडिओ- ६४ पुणे या संस्थेच्या “डियर फादर”, सुमंगल फाउंडेशन कल्याण या संस्थेच्या “गुडघ्या एवढ्या महापुराची कहाणी” व प्रायोगिक रंगमंच संघ, मुंबई यांच्या बेईमान या कथा अभिवाचनाला सांघिक उत्तेजनार्थ क्रमांक जाहीर झाला असल्याचे नाट्य रसिकहोचे अध्यक्ष व प्रमुख आयोजक सुरेश पवार यांनी सांगितले.
या राज्यस्तरीय कथा साहित्य अभिवाचन स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, नाशिक ठाणे तसेच कल्याण डोंबिवली मधील एकूण २३ संघांचा सहभाग होता. कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथील कॉन्फरन्स हॉलमधील या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ करिता नगरसेविका आर्या नाटेकर, ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी भिकू बारस्कर, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे कार्यकारणी सदस्य शिवाजी शिंदे, नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष रवींद्र सावंत, बालरंगभूमी परिषद कल्याण अध्यक्षा सुजाता डांगे, ज्येष्ठ अभिनेते राम दौंड, आनंद जाधव, सुधीर चित्ते, डॉ. प्रदीप सरवदे, किरण डांगे आणि राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष हेमंत यादगिरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ नाट्य अभ्यासक आणि चतुरस्त्र रंग कर्मी अरुण कदम व आकाशवाणी वृत्त निवेदिका तसेच अनेक अभिवाचन कार्यक्रमाच्या अनुभव असलेल्या श्रद्धा वझे यांनी परीक्षण केले. नाट्य रसिकहो अध्यक्ष म्हणून बोलताना सुरेश पवार म्हणाले की, यंदाचे या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. व यंदाचा प्रतिसाद हा अधिकच सुखावह असाच असल्याने यापुढे सदर स्पर्धा अधिकाधिक आकर्षक व दर्जेदार करण्यासाठी निश्चितच कटिबद्ध राहू असे सांगितले. याप्रसंगी अभिनेते सुधाकर वसईकर, अविनाश साळवी, विशाल राऊत, निलेश शास्त्री, किरण खांडगे, माणिक शिंदे, सिताराम शिंदे, महेश जोशी, हेमंत कर्णिक, डोंगरे, आदी मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती.
