स्वाभिमान व समता शिवरायांच्या स्वराज्याचे सूत्र – कैलाश देसाई

अनिल ठाणेकर

सांगली – ‘बंधुता, स्वाभिमान व समता हेच शिवरायांच्या स्वराज्य पायाभरणीचे सूत्र होते. शिवरायांनी घालून दिलेली स्वराज्याची आदर्श नैतिक मूल्ये आजच्या राज्यकर्त्यांनी स्वीकारावीत’, असे प्रतिपादन शिवशंभु प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक  कैलाश देसाई यांनी केले. मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या इतिहास विभागामार्फत आयोजित केलेल्या ‘छत्रपती शिवाजी राजांचे सांस्कृतिक धोरण व आजची दशा’ या विषयावरील व्याख्यानामध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अंकुश बेलवटकर होते.  कैलाश देसाई पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते.  शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही.  आपल्या राजकीय विरोधकांच्या आईचा, पत्नीचा, मुलांचा, बहिणींचा आदर, सन्मान आणि संरक्षण करण्याचे शिवरायांचे धोरण होते. परंतु आजचे राज्यकर्ते अगदी खालच्या पातळीवर येऊन विरोधकांच्या कुटुंबीयांवर टीका करतात. जाती-जाती धर्मा-धर्मात द्वेष पसरवण्याचे काम करतात. वतनदारी व जहागीरदारी व्यवस्था शिवरायांनी संपविली. परंतु आजचे राज्यकर्ते नवसरंजामदार बनले आहेत. आजची राज्यव्यवस्था शिवरायांच्या स्वराज्याच्या विचाराला व लोकशाहीला घातक आहे. राजकारण करणाऱ्यांनी शिवरायांच्या नावे मतांचा जोगवा मागू नये. सर्व जाती धर्मीयांचा मानसन्मान ठेवावा. शिवरायांचे स्वराज्य म्हणजे आधुनिक लोकशाहीचा पायाच होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिवरायांच्या स्वराज्याचे संविधानात रूपांतर केले. शिवरायांचा ध्वज गेरू व मातीच्या रंगाचा आहे तो ध्वज वारकरी आहे. वारकरी परंपरेचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.” अध्यक्ष डॉ. बेलवटकर म्हणाले. “पर्यावरण रक्षण, शेती सुधारणा व लोककल्याणकारी कामे शिवाजी राजांनी घडवून आणली. त्यांच्या आज्ञापत्रातून स्वराज्याची आदर्श मूल्ये दिसून येतात.स्वराज्याला नैतिक अधिष्ठान शिवरायांनी मिळवून दिले. त्यांनी कधीच आत्यंतिक धर्मवाद जोपासला नाही. कर्मकांड व अंधश्रद्धा विरोध केला.”कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. राम घुले यांनी केले. या निमित्ताने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कल्याणी साळुंखे, द्वितीय क्रमांक अक्षय पाटील व तृतीय क्रमांक तृप्ती गोंधळी यांना प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षक प्रा. संध्या साठे व प्रा. स्वाती चौधरी होते. बीए भाग एकच्या विद्यार्थ्यांनी  शिवबाचा पाळणा व पोवाडा सादर केला.छत्रपती शिवाजी राजे व स्वराज्याची राजचिन्हे या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.  त्यामध्ये प्रथम क्रमांक आरती चव्हाण, द्वितीय क्रमांक श्रावणी पाटील व तृतीय क्रमांक करुणा काळे यांना प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. शैलजा पाटील व प्रा. उत्तरा पाटील यांनी केले. प्रथम तीन क्रमांकांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे व रोख रक्कम देण्यात आली. विद्यार्थिनींनी शिवकालीन वेशभूषा परिधान केली. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सूत्रसंचालन करुणा काळे यांनी केले. प्रा. के. बी. पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिव पदयात्रा इस्लामपूर शहरात काढण्यात आली. प्रा वर्षा पाटील यांनी पदयात्रेचे संयोजन केले. महाविद्यालयाचा शिक्षक वर्ग व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *