अनिवार्य `वंदे मातरम’चा निर्णय ठाण्याच्या महापौरांनी टाळला
नगरसेविका अर्चना मणेरा यांची नाराजी
ठाणे: केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत `वंदे मातरम’चे पूर्ण गीत अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ठाणे महापालिकेच्या प्रत्येक महासभेत सहा कडवी असलेले संपूर्ण राष्ट्रीय गीत `वंदे मातरम’ घ्यावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे केली होती. दरम्यान, या मागणीबाबत महापौरांनी सोमवारी झालेल्या महासभेत चर्चा टाळली. तसेच विषय प्रलंबित ठेवल्यामुळे नगरसेविका अर्चना मणेरा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रीय गीत `वंदे मातरम’ला १५० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने केंद्र सरकारने `वंदे मातरम’चे पूर्ण गीत अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरम हा एक मंत्र झाला. त्याने स्वातंत्र्यानंतरही लाखो भारतीयांना प्रेरणा दिली. भारतीयांमध्ये नवी ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण केला. यापुढील काळातही `वंदे मातरम’ हा आपल्या भारतीयांचा एक महत्त्वाचा प्रेरणास्त्रोत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने `वंदे मातरम’बद्दल नवी नियमावली लागू केली आहे. त्यानुसार सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळांमधील समारंभ आणि इतर औपचारिक कार्यक्रमांमध्ये संपूर्ण `वंदे मातरम’ अनिवार्य असेल. ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात व नागरिकांच्या दृष्टीकोनातून महासभा ही महत्त्वाची आहे. त्यामुळे `वंदे मातरम’ गीताला मानवंदना देण्यासाठी व ठाणेकरांना प्रेरणा देण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक महासभेत संपूर्ण `वंदे मातरम’ गीत वाजविण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केली आहे. याबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याबरोबरच महापालिका सचिव मनिष जोशी यांना पत्र पाठवून २३ फेब्रुवारीच्या महासभेपासून वंदे मातरम अनिवार्य करण्याची आग्रही मागणी केली होती. परंतु, या विषयावर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना आठवण करून देऊनही चर्चा टाळून निर्णय न घेतल्यामुळे अर्चना मणेरा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
