केरळ नव्हे आता केरळम म्हणा !
नवी दिल्ली : भारताच्या दक्षिणेकडील केरळ राज्याला आता यापुढे केरळम म्हणावे लागणार आहे. केळरचे नाव बदलून ‘केरळम्’ करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली केरळ सरकारची ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्ये केरळ विधानसभेने एकमताने ठराव मंजूर करून राज्याचे नाव ‘केरळ’ ऐवजी ‘केरळम्’ करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली होती. या ठरावांचे प्रस्ताव मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी मांडले होते. अलीकडेच केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या निर्णयाला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे या प्रक्रियेला वेग आला.
२०२४ मधील ठरावात नमूद करण्यात आले होते की, मल्याळम भाषेत राज्याचे मूळ नाव ‘केरळम्’ आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यात आली, तेव्हापासून केरळ राज्याच्या स्थापनेचा दिवस ‘केरळ पिरवी’ म्हणून साजरा केला जातो. मल्याळम भाषेत राज्याला ‘केरळम्’ असेच संबोधले जाते. मात्र, भारतीय संविधानाच्या पहिल्या अनुसूचीत राज्याचे नाव ‘केरळ’ असे नोंदविण्यात आले आहे.
या विसंगतीमुळे संविधानाच्या कलम ३ अंतर्गत दुरुस्ती करून अधिकृत नाव ‘केरळम्’ करण्याची मागणी केरळ विधानसभेने केली होती. अखेर केंद्र सरकारने या मागणीला मंजुरी दिल्याने राज्याच्या अधिकृत नावात बदल होणार आहे.
या निर्णयाला आगामी केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले असून, मल्याळम भाषिक अस्मितेला मान्यता देणारा हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
