गांधारी रिंगरोडवरील भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी
उपविभाग प्रमुख कुणाल कुलकर्णी यांचे सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र
कल्याण: कल्याण पश्चिमेतील गांधारी वडवली रिंगरोड येथे वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असून या अपघाताला कारणीभूत असलेल्या भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना विभाग उपप्रमुख कुणाल कुलकर्णी यांनी वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे.
गांधारी वडवली रिंगरोड हा रस्ता पूर्णत्वास आलेला नाही. या रस्त्यावर दिवसा व रात्रीच्या वेळी भरधाव दुचाकीस्वार व चारचाकी वाहन चालक आपल्या वाहनांची रेसिंग लावून इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी याठिकाणी अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वाहनांच्या वेगामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी स्पीडगन, दुभाजक, गतिरोधक लावून ठोस कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपविभाग प्रमुख कुणाल कुलकर्णी यांनी केली आहे. दरम्यान कुलकर्णी यांच्या पत्रानंतर वाहतूक पोलीस सतर्क झाले असून रिंगरोडवर बंदोबस्त लावून वाहनचालकांची तपासणी करत कारवाई केली आहे.
