ठाणे महापालिकेच्या महासभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपणाची मागणी
भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी यांचे महापौरांना पत्र
ठाणे,   : ठाणे महापालिकेच्या ५ मार्चपासून होणाऱ्या महासभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी केली आहे. महापालिकेच्या २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या गोंधळातील सभांनंतर पारदर्शक निर्णयांसाठी व नागरिकांच्या माहितीसाठी ऑनलाईन थेट प्रक्षेपणाची सूचना नगरसेविका कोळी यांनी केली आहे.
महापालिकेच्या २३ फेब्रुवारीच्या महासभेत काही मुद्द्यांवरून गदारोळ झाला होता. दुर्देवाने काही महत्त्वाच्या लक्षवेधी सूचना व काही प्रस्ताव स्विकारले गेले नाहीत. तर जनहिताच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून खुलासा न मिळाल्यामुळे नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सभेतील कामकाजाबाबत काही नागरिकांनी माहिती विचारली होती. मात्र, लोकप्रतिनिधी असूनही आम्ही त्यांच्या प्रश्नांचे समाधान करू शकलो नाही, अशी खंत नगरसेविका नम्रता कोळी यांनी व्यक्त केली. तसेच सुमारे चार वर्षानंतर ठाणे महापालिकेत लोकप्रतिनिधींच्या राजवटीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नगरसेवकांकडून सामान्य नागरिकांच्या अपेक्षा असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
नगरसेवकांकडून महासभेत मांडण्यात येणारी लक्षवेधी सूचना, प्रस्ताव आणि प्रश्न, महासभेत होणारी चर्चा, चर्चेअंती घेतलेले निर्णय, प्रशासनाकडून देण्यात येणारी विविध प्रश्नांसंदर्भातील माहिती व खुलासा आदींसह महासभेच्या कामकाजात पारदर्शकता अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या ५ मार्चपासून होणाऱ्या महासभेचे थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी पत्राद्वारे केली. या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव व सचिव मनिष जोशी यांनाही पत्र पाठविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *