धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा २०२६ दिमाखात संपन्न
अल्फी मेक्कदतचा दुहेरी मुकुट, जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंची चमकदार कामगिरी
१३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथे पार पडलेली धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात यशस्वीरीत्या संपन्न झाली. ठाणे महानगरपालिकेच्या आश्रयाखाली ठाणे सिटी अँड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंचा मोठा प्रतिसाद लाभला. विविध वयोगटांतील १० गटांमध्ये सामने खेळविण्यात आले आणि तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाने जिल्ह्यातील बॅडमिंटन वातावरण अधिक बळकट केले.
स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरला अल्फी मेक्कदत याचा दुहेरी किताब. अल्फीने अंडर १३ मुलांच्या एकेरी गटात तसेच अंडर १५ मुलांच्या एकेरी गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटावर आपले नाव कोरले. दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये त्याने अत्यंत प्रतिभावान पियूष सुतारवर मात करत दोन उदयोन्मुख चॅम्पियनमधील थरारक आणि उच्च दर्जाच्या लढती प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्या.
अंडर ९ मुलांच्या एकेरी गटात शिवांश चव्हाण विजेता ठरला तर विहान अनिखिंडी उपविजेता झाला. अंडर ९ मुलींच्या एकेरीत यश्वी कोरगावकर हिने विजेतेपद पटकावले आणि यम्मी मानोन हिला उपविजेतेपद मिळाले. अंडर ११ मुलांच्या एकेरीत योहान नायर विजेता ठरला तर वेद चव्हाण उपविजेता ठरला. अंडर ११ मुलींच्या एकेरीत नैरा पहारिया हिने बाजी मारली आणि सान्वी वागळे उपविजेती ठरली. अंडर १३ मुलींच्या एकेरीत शनाया तावटे हिने विजेतेपद पटकावले तर अद्विका मोरे उपविजेती ठरली. अंडर १५ मुलींच्या एकेरी गटात आर्या शिंदे विजेती ठरली आणि शुभ्रा कुलकर्णी उपविजेती ठरली. खुल्या गटातील मुलांच्या एकेरीत मंथन पाडेल विजेता झाला तर अर्णव सावंत उपविजेता ठरला. खुल्या गटातील मुलींच्या एकेरीत आर्या घाडगे हिने विजेतेपद मिळवले आणि गुंजन कोठारी उपविजेती ठरली.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा वरिष्ठ बॅडमिंटनपटू व क्रीडाप्रेमी उदय गायकवाड, रामदास शिंदे आणि सुनील सोपारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. उदय गायकवाड आणि रामदास शिंदे यांनी विजेत्या खेळाडूंना नैतिक मार्गदर्शन देत त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणा दिली. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून नरेश गुंडले यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामने पार पाडले.
या भव्य आयोजनामागे संदीप कांबळे आणि प्राजक्ता रानडे-कांबळे यांचे विशेष परिश्रम मोलाचे ठरले. तसेच धर्मवीर क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अशोक वैती आणि ठाणे महानगर पालिकेच्या क्रीडा उप-आयुक्त मीनल पालांडे यांचा देखील या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात सिंहाचा वाटा होता. खेळाडूंना स्पर्धेदरम्यान सातत्याने मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक श्रीकांत वाड तसेच प्रशिक्षक मितेश हाजीरनीस, फुलचंद पासी, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर उपस्थित होते. श्रीकांत वाड यांनी खेळाडूंसोबतच पालकांनाही योग्य मार्गदर्शन करत स्पर्धेच्या दर्जात भर घातली.
धर्मवीर क्रीडा संस्थेच्या पुढाकारामुळे आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली असून, ठाणे जिल्ह्यातील बॅडमिंटनला नवी दिशा देणारा हा क्रीडा महोत्सव ठरला आहे. भविष्यातही अशाच दर्जेदार स्पर्धांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना व्यापक व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
