प्रभाग क्र. ८ मध्ये पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा
नगरसेविका कांचन कुलकर्णी आक्रमक
कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. ८ मध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कॉंग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
प्रभाग क्र. ८ या प्रभागात बहुसंख्य मुस्लिम बांधव वास्तव्यास असून सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना गेल्या दहा दिवसांपासून बिना पाण्याचे राहावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. निवडणुकीच्या काळात या भागात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात पुरवले जात होते. मात्र निवडणुकीनंतर अचानक पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
पुढील आठ दिवसांच्या आत प्रभाग क्र. ८ मधील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व नियमित करावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्त, महापौर तसेच संबंधित अधिकारी यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाची राहील असा इशारा नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *