भुमरेंचा ‘समृद्ध’ घोटाळा

 समृद्धी महामार्गात ११५० कोटींचा महाघोटाळा ० ड्रायव्हरच्या नावे हिबानामा ० अंबादास दानवेंचा पुराव्यानिशी आरोपाने खळबळ

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांचा समृद्ध घोटाळ्याचा आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पर्दापाश केला आहे. समृद्धी महामार्गावरील जटवाडा परिसरातील २३ एकर ३० गुंठे जमीन ड्रायव्हरच्या नावे ‘हिबानामा’ (बक्षीस पत्र) करून बळकावल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. एनअधिवेशनाच्या काळात दानवे यांनी या भ्रष्ट्राचाराचे पुरावेच उघड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. समृद्धी मार्गातील जमीन संपादनात भुखंडांचे श्रीखंड खाण्यासाठी हा प्रताप भुमरेंनी केल्याचा आरोप दानवेंनी केला.

अंबादास दानवे यांच्या आरोपानुसार, संबंधित जमीन संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबानामा (बक्षीस पत्र) करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हा हिबानामा १९७१ साली झाल्याच्या दाखवलं जात आहे, मात्र जावेद रसुल शेख याचा जन्म १९८५ मध्ये झाल्याचा दावा दानवे यांनी केला. त्यामुळे १९७१ मध्ये जन्माआधी त्याच्या नावावर हिबानामा कसा होऊ शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

समृद्धी महामार्गासाठी संपादन

जटवाडा येथील ही जमीन महाराष्ट्र विकास मंडळाने संपादित केल्याचे सांगितले जाते. समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्याचे आदेश झाल्यानंतर तिचे संपादन मूल्य तब्बल ११५० कोटी रुपये निश्चित करण्यात आले. मात्र, इतक्या मोठ्या रकमेच्या मोबदल्यासाठी काही जणांनी मालकी हक्काचा दावा करत पैसे मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत खासदार संदीपान भुमरे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “आपल्यावर जो आरोप करण्यात आला आहे तो चुकीचा आहे. तसा कोणताही हिबानामा झालेला नाही. जावेद रसुल हा माझा ड्रायव्हर आहे, पण त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आरोप करण्यात आलेला जावेद हा दुसराच असेल. अंबादास दानवेंना सगळीकडे संदीपान भुमरेच दिसतात. अंबादास दानवे यांनी त्यांचे आरोप सिद्ध करून दाखवावं.”असे आव्हान भुमरेंनी दिले.

चौकट

सीआयडी चौकशीची दानवेंची मागणी

या प्रकरणात सविस्तर कागदपत्रांसह मुख्यमंत्री यांना पत्र लिहून सीआयडी चौकशीची मागणी केल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं. चौकशी झाल्यास सर्व सत्य बाहेर येईल, असा दावा त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *