मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक म्हणून अरविंद मालखेडे यांनी पदभार स्विकारला
( राजेंद्र साळसकर )
मुंबई -अरविंद मालखेडे यांनी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी रेल्वे बोर्डात प्रधान कार्यकारी  संचालक (पायाभूत सुविधा) म्हणून रुजू होणाऱ्या एस. एस. गुप्ता यांच्याकडून पदभार स्वीकारला. मालखेडे हे १९९१ च्या बॅचचे आयआरटी एस अधिकारी आहेत. त्यांनी २०२४-२०२६ दरम्यान मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, २०२२ ते २०२४ दरम्यान दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आणि २०१९ ते २०२२ दरम्यान दक्षिण पश्चिम रेल्वेचे हुबळी विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
२०१३-१५ या वर्षात जेव्हा अत्यंत महत्त्वाच्या लुमडिंग- बदरपूर- सिलचर मार्गाचे गेज-रूपांतरण सुरू होते, तेव्हा त्यांनी ईशान्य सीमावर्ती रेल्वे (एनएफआर) येथे मुख्य मालवाहतूक व्यवस्थापक (सीएफटीएम) म्हणून आव्हानात्मक पद भूषवले आहे. या कार्यकाळात, त्यांनी त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, मेघालय, नागालँड आणि लोअर आसाम सारख्या दूरच्या राज्यांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा करण्याचे नियोजन केले. मालखेडे यांनी मध्य रेल्वेमध्ये परिचालन, वाणिज्य विभाग आणि सामान्य प्रशासन यासारख्या विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी मुंबई विभागातील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, उपमुख्य परिचालन व्यवस्थापक (मालवाहतूक), उपमहाव्यवस्थापक (जनरल), उपमुख्य दक्षता अधिकारी (ट्रॅफिक) आणि इतर पदांवर काम केले आहे. त्यांनी २०१५ ते २०१९ या काळात आयआरसीटीसीमध्ये पश्चिम विभागाचे ग्रुप महाव्यवस्थापक म्हणून प्रतिनियुक्तीवर काम केले आहे. १९९९-२००४ दरम्यान त्यांनी  छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथील कॉन्कर (CONCOR) मध्ये डीडी इनलँड कंटेनर डेपो (ICD) येथे स्थापित केलेल्या प्रतिनियुक्तीवर होते तसेच आयसीडी नागपूरचेही ते प्रमुख होते.
अरविंद मालखेडे हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत आणि ते चेव्हनिंग गुरुकुल स्कॉलर आहेत. २००९ मध्ये त्यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) मधून नेतृत्व आणि व्यवस्थापन कार्यक्रमाचा अभ्यास केला आणि युरोपमधील आंतरराष्ट्रीय संस्थांचा त्यांनी अनुभव घेतला. त्यांनी आयएनएसईएडी (INSEAD) सिंगापूर, आयसीएलआयएफ (ICLIF) मलेशिया, हाँगकाँग, जर्मनी इत्यादी ठिकाणी विविध प्रशिक्षण आणि कार्यक्रमात सहभाग घेतले आहेत. मुंबईतील रस्त्यावरील मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसोबत ते सामाजिक कार्यात जवळून सहभागी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *