अनिल अंबानींचे
३,७१६ कोटींचे घर
ईडीकडून जप्त…
मुंबई : एप्स्टिन फाईलमधिल उघड झालेला सहभाग आणि बँक कर्जातील घोटाळ्याचा टपका असणाऱ्या उद्योगपती अनिल अंबांनींचे मुंबईतील ३,७१५.८३ कोटी रुपयांचे १७ मजली अलिशान घर ईडीने आज जप्त केलेय. अनिल अंबानी यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात असून त्यांच्या अटकेची ही सुरुवात असल्याचे उद्योग जगतात कुजबूज आहे.
ही कारवाई रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित कथित बँक फसवणूक प्रकरणाशी जोडलेली असून, तपास प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट अंतर्गत सुरू आहे.
अनिल अंबानी यांची मुंबईच्या पाली हिल परिसरात ‘अबोध’ नावाची १७ मजली आलिशान इमारत आहे. ही मालमत्ता देशातील सर्वात महागड्या खासगी निवासस्थानांपैकी एक मानली जाते.
अनिल अंबानी आणि त्यांच्या समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत १५,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी दिलेल्या आश्वासनाची दखल घेतली आहे. या आश्वासनात अंबानी देश सोडणार नाहीत आणि तपासात कोणताही अडथळा निर्माण होऊ देणार नाहीत, असे नमूद करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास संस्थांच्या संथ कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने निष्पक्ष तपासाची अपेक्षा व्यक्त करत, वेळोवेळी तपास प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
ईडीने गेल्या वर्षी सीबीआय कडून दाखल एफआयआरनंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. एफआयआरमध्ये अनिल अंबानी, आरकॉम आणि इतरांविरोधात फसवणूक, कटकारस्थान आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. तपासाचा मुख्य केंद्रबिंदू आरकॉम आणि तिच्या सहयोगी कंपन्या असून, त्यांनी २०१० ते २०१२ दरम्यान भारतीय आणि परदेशी बँकांकडून ४०,००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेतल्याचा आरोप आहे. यापैकी पाच कर्ज खात्यांना नंतर बँकांनी ‘फ्रॉड’ घोषित केले आहे.
