कल्याण पूर्वेत बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. ही तरुणी ‘बारावी कॉमर्स’मध्ये शिक्षण घेत होती. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत आपल्याला अपयश येईल, आपण उत्तीर्ण होणार नाही, या प्रचंड मानसिक दडपणाखाली तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये तिने आपल्या मनातील भीती आणि पालकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने म्हटले आहे की, मी गेल्यावर आई-बाबा त्रास करुन घेऊ नका. या चिठ्ठीमुळे परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांवर असलेल्या मानसिक दबावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही आत्महत्या केवळ परीक्षेच्या भीतीतून झाली आहे की यामागे काही वैयक्तिक किंवा अन्य कारण आहे, या अंगाने पोलीस तपास करत आहेत.
