कुंभारखाण पाडा स्मशानभूमीतील समस्या युद्धपातळीवर सोडवा अन्यथा आंदोलन छेडणार
भाजप पदाधिकाऱ्यांचा सहाय्यक आयुक्तांना इशारा
कल्याण : डोंबिवली पूर्वकडील शिवमंदिर येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आवाहनानुसार डोंबिवली पश्चिम येथील कुंभारखाणपाडा येथील स्मशानभूमीत पार्थिवावरती अंत्यसंस्कार करावेत असे सांगण्यात आले. मात्र या स्मशानभूमीवर अंतविधीसाठी लागण्याऱ्या सुविधांचा अभाव असून सदर ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात नाही आहे. कुंभारखाणपाडा मोक्षधाम स्मशानभूमीत अनागोंदी कारभाराबाबत मंगळवारी प्रभागक्षेत कार्यालयात माजी नगरसेवक प्रकाश भोईर, संदीप म्हात्रे, प्रशांत पाटेकर, मनोज वैद्य, विशाल पारखे, जयप्रकाश सावंत,पवन मोरे आणि इतर भाजप पदाधिकारी प्रभागक्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना रीतसर पत्र दिले.
कुंभारखाणपाडा मोक्षधाम स्मशानभूमीत २४ तास कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक नियुक्त करून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा द्यायलाच पाहिजेत अशी मागणी भाजप पदाधिकारी यांनी पालिकेकडे दिली आहे. जर याकडे पालिकेने लक्ष दिले नाहीतर आंदोलन केले जाईल इशारा देण्यात आला आहे. या स्मशानभूमीत २४ तास उपलब्ध राहतील असे कर्मचारी नाहीत. अलीकडेच येथे दोन पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणले असता स्मशानभूमीला कुलूप होते. ज्यामुळे एका कुटुंबाला दुसऱ्या स्मशानभूमीत जावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी दिली आहे.
स्मशानभूमीत पूर्णवेळ सुरक्षा रक्षक नसल्यामुळे स्मशानभूमीच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती आहे, तसेच रात्रीच्या वेळी येथे असुरक्षित वातावरण असते. स्मशानभूमीत पाण्याची तीव्र टंचाई आहे. स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ असून त्यांची नियमित सफाई केली जात नाही, असे भोईर यांनी सांगितले..
