जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आढावा बैठक दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करावे, अन्यथा चौकशी
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा इशारा
अशोक गायकवाड
रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून करण्यात येणारी कामे ही दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत. दिलेली डेडलाईन पाळली गेली पाहिजे अन्यथा, संबंधित विभाग प्रमुखाची चौकशी केली जाईल. कामाच्या दर्जाबाबतही चौकशी केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिला. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ बाबत आज जिल्हाधिकारी जिंदल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी सादरीकरण करुन विभागनिहाय माहिती दिली. जिल्हाधिकारी जिंदल यांनी विभागनिहाय आढावा घेतला. झालेली कामे, आलेली मागणी, दायित्व याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. ते म्हणाले, दायित्वाची मागणी करावी. ५ मार्चपर्यंत मागणी न आल्यास चौकशी केली जाईल. प्रशासकीय मान्यता घेताना घातलेल्या अटी, शर्ती प्रमाणे पाहिले जाईल. करदात्यांचा हा पैसा आहे, तो व्यवस्थित दर्जात्मक कामांसाठी वापरला गेला पाहिजे, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. बाह्य संस्थेमार्फत दर्जाबाबतदेखील तपासणी केली जाईल. १५ मार्चपर्यंत खर्च करावा, ज्याच्यासाठी निधी दिला जातो, ते काम देखील वेळेवर पूर्ण झाले पाहिजे, तुम्ही सर्वजण १०० टक्के निधी खर्च करणार अशी मला खात्री आहे. असे सांगतानाच त्यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *