धक्कादायक : कर्ज फेडण्यासाठी ९ जणांनी विकली किडणी

मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश

सहा सावकारांची संपत्ती गोठवणार

मुंबई : माणूसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, सावकाराचा जाच टाळण्यासाठी  ९ जणांनी चक्क किडण्या विकल्याची माहिती बुधवारी विधानसभेत देण्यात आली. यापैकी ७ जण परराज्यातील असून, दोघे पीडित महाराष्ट्रातील आहेत. यातील एक शेतकरी असल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित सहा सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री भोयर म्हणाले, चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मिथुर येथील रोशन कुडे याने खासगी सावकाराकडून ९.१५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यापोटी सहा आरोपींना ४८.५३ लाख रुपयांची रक्कम आणि एक एकर जमीन ही परतफेड म्हणून दिली. त्यानंतरही तगादा लावल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने कंबोडिया येथे जाऊन आठ लाख रुपयांना किडनी विकून कर्ज फेडले. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास केला असता सोलापूर येथील एका मध्यस्था करवी कंबोडिया येथे किडनी विकल्याचे समोर आले आहे. यामध्ये मध्यस्थाने स्वतःसह आणि नऊ व्यक्तींच्या किडन्या कंबोडिया तसेच तामिळनाडूतील स्टार किंम्स हॉस्पिटल येथे विकल्या. या प्रकरणात सावकारी करणाऱ्या सहा आरोपींबरोबरच किडनी खरेदी विक्रीत सहभागी असणाऱ्या अन्य पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. यापैकी आठ जणांना अटक करण्यात आली  असून एका आरोपीला फरार घोषित केले असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.

त्यावर आमदार भातखळकर यांनी आरोपींना मकोका लावणार का, असा सवाल केला. ही गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी विशेष न्यायालय शिक्षा करणार का? सावकारांचे परवाने रद्दचे काय झाले?, असे प्रश्न उपस्थित केले. त्याचप्रमाणे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही या रॅकेटची पाळेमुळे दिल्ली आणि दक्षिण भारतापर्यंत पसरल्याची माहिती दिली. यात दिल्लीतील एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा समावेश असून, या डॉक्टराला अटक करण्याचे धाडस सरकार दाखवणार का? असा प्रश्न उपस्थित केला. उत्तरादाखल मंत्री भोयर म्हणाले, या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सहाजणांची संपत्ती गोठवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. आरोपी पद्मश्री असेल की अन्य कोणी, कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *