पोक्सो प्रकरणात आरोपीस अटींसह जामीन
कल्याण सत्र न्यायालयाचा निर्णय
मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो प्रकरणातील आरोपी प्रमोद मौळे यास कल्याण सत्र न्यायालय येथील फास्ट ट्रॅक न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती व्ही. पत्रावळे यांनी हा आदेश दिला. सदर आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपीतर्फे वकील सागर तांबे यांनी युक्तिवाद करताना घटना परस्पर ओळख व जवळीक असलेल्या संबंधातून घडल्याचा दावा केला. तसेच तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाले असून आरोपी काही महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचा कोणताही गुन्हेगारी पूर्वइतिहास नसल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सरकारी पक्ष व फिर्यादीकडून जामीन अर्जास विरोध करण्यात आला. न्यायालयाने जामीन मंजूर करताना निरीक्षण नोंदवले की, तपास पूर्ण झाला असून खटल्यास वेळ लागू शकतो. यावेळी मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्णयांचा दाखला देत, अशा स्वरूपाच्या प्रकरणांत परिस्थितीनुसार सौम्य दृष्टिकोन ठेवता येतो, असे नमूद करण्यात आले. त्यानुसार आरोपीस वैयक्तिक जामिनावर मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *