वाहने सावकाश चालवा येथे निलगायी आहेत
शहापूरात शेत, माळरानावर नीलगायींचे कळप,
अविनाश उबाळे
ठाणे : नीलगायींचे कळप स्थलांतरित होताना भटकंतीत रस्त्यावर देखील येत आहेत.यावेळी रस्ता ओलांडून जाताना निलगायीला भरधाव वाहनांची धडक लागून यात नीलगायींचा अपघात झाल्याच्या घटना देखील येथे घडलेल्या आहेत.नीलगायींचे हे वाढते अपघात रोखण्यासाठी व नीलगायी संरक्षणासाठी वनविभागाकडून आता जनजागृती केली जात आहे.रस्त्यावर वाहनं सावकाश चालवावीत असे आवाहन करण्यासाठी नीलगाय अधिवास असलेल्या संरक्षित क्षेत्रात फलक लावण्यात आलेले आहेत. किन्हवली परिसरात रस्त्याकडे लावण्यात आलेले हे फलक लक्ष वेधून घेत आहेत.
शहापूर तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील बहुतांश जंगल हे समृद्धी महामार्ग व विविध धरण प्रकल्प व रस्ते प्रकल्पांसाठी भुईसपाट झाले आहे.काही वर्षांपासून प्रकल्पांसाठी प्रचंड जंगल तोड झाल्याने येथील दाट,हिरवीगर्द जंगल ही नामशेष झाली आहेत.परिणामी वन्यजीवांचे अधिवास आता धोक्यात सापडले आहेत.दुसरीकडे अन्न व पाण्याच्या शोधात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव जंगल सोडून आता जंगला शेजारील गाव वस्त्यांकडे कुच करीत आहेत.अशाच प्रकारे जंगलातील नीलगायींचे कळप हे गाव वस्ती लगत माळरानावर स्थलांतरित झालेले दिसत आहेत.हे नीलगायींचे तांडे शेतकऱ्यांच्या रोज नजरेस पडत आहेत.शिकार आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या निलगायींचे कळप हे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करताना दिसत आहेत. निलगायी या भाजीपाला आणि कडधान्य फस्त करीत आहेत. निलगायींच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे चिंतेत सापडले आहेत. शहापूर तालुक्यातील प्रादेशिक विभागाच्या जंगलातील शेणवा मळेगाव, कुडशेत, मुसई बेडीसगाव, परटोली, उंब्रई, कानवे, चेरवली, आष्टा, आदिवासी, लवले, ठुणे आणि किन्हवली परिसरातील शेत माळरानावर सध्या मोठ्या प्रमाणावर निलगायी आढळून येत आहेत. या निलगायी शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या रब्बी हंगामातील हरभरा, वाल, मटकी इत्यादी कडधान्ये तसेच भेंडी, घोसाळी, शिरवळे, भोपळा, गवार, काकडी व पालेभाज्या यांची प्रचंड नासधूस करुन नुकसान करीत आहेत. यामुळे मोठे अर्थीक नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.निलगायींची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव पाहता रब्बी हंगामातील पिके घेण्याचे संकट शेतकऱ्यांनसमोर आता उभे राहिले आहे.यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.रब्बी हंगामात निलगायींच्या शेत मळ्यातील वाढत्या उपद्रवामुळे अर्थीक नुकसानाला देखील तोंड द्यावे लागते आहे अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे.या निलगायींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशःमेटाकुटीला आले आहेत.या नीलगायींच्या समस्येबाबत वन विभागाकडे स्थानिक शेतकरी रोज तक्रारी करीत आहेत.या निलगायींचा उपद्रव थांबविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना वनविभागाकडून होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु नीलगाय या वन्यजीव प्राणी असल्याने वनविभागाला याबाबत काहीएक करता येणार नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.एकिकडे जंगल भुईसपाट होत असल्याने वन्यप्राण्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे.तर दुसरीकडे अन्न आणि पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या वन्यजीवांची वाताहत होताना दिसत आहे.असे हे विदारक चित्र येथे दिसत आहे.नीलगायींच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होताच तातडीने घटनास्थळी पाहणी करुन रीतसर पंचनामा करून त्या शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जात आहे असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *