‌‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‌’ योजनेच्या लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ‌‘ई केवायसी‌’ प्रक्रियेनंतर या योजनेचा डिसेंबरचा लाभ मिळालेल्या महिलांची संख्या 86 लाखांनी घटली आहे.
महाराष्ट्रात सुरुवातीला ‌‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‌’ योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या दोन कोटी 46 लाख इतकी होती. डिसेंबर महिन्याचा लाभ एक कोटी 60 लाख महिलांना दिला गेला असल्याची माहिती आहे. म्हणजेच लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 86 लाखांनी कमी झाली आहे. लाडकी बहीण योजनेच्या एकूण लाभार्थी महिलांच्या संख्येपैकी एक कोटी 90 लाख महिलांनी ‌‘ई केवायसी‌’साठी अर्ज केला आहे. याचाच अर्थ दोन कोटी 46 लाख महिला लाभार्थ्यांपैकी 55 लाख महिला लाभार्थीकडून ‌‘ई केवायसी‌’ करण्यात आलेले नाही.
‌‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‌’ योजनेच्या एक कोटी 60 लाख महिलांनी योग्य प्रकारे ई केवायसी केल्याने डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आल्याची माहिती आहे. ‌‘ई-केवायसी‌’ प्रक्रिया पूर्ण केलेल्या एक कोटी 90 लाख महिलांपैकी पर्याय निवडण्यात चूक झालेल्या महिलांना ‌‘ई केवायसी‌’ दुरुस्त करता येईल. ‌‘ई केवायसी‌’ दुरुस्तीची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत आहे.
ई केवायसी: दुरुस्तीची शेवटची संधी
‌‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‌’ योजनेतून लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात, तर पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ‌‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‌’ योजनेतून पाचशे रुपये दिले जातात. महायुतीमधील पक्षांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. ते कधी पूर्ण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा

‌‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‌’ योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारीच्या दरम्यान देण्यात आला होता. आता लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये करण्यात आली होती. महायुती सरकार सत्तेत येण्यास ही योजना कारणीभूत ठरली होती. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पात्र ठरण्यासाठी संबंधित कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये नसावी. याशिवाय संबंधित कुटुंबातील व्यक्तीच्या नावे चार चाकी वाहन नसावे, अशा अटी होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *