नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांचा अजून एक फ्रॉड उघडकीस आला आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन विरोधात सीबीआयनं आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. शासकीय बँक व्यवहारांमध्ये २ हजार २२० कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आज दिवसभर अनिल अंबानींची ईडी कडून चौकशी करण्यात आली आहे. सायंकाळी उशीरा त्यांना चौकशीनंतर सोडण्यात आले.
कालच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. त्यांचे मुंबईतील आलिशान निवासस्थान “अॅबोड” जप्त केले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ही मालमत्ता अंदाजे ३७१६.८३ कोटींची आहे.
ही कारवाई मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत करण्यात आली. ईडीने या संदर्भात तात्पुरते जप्तीचे आदेश जारी केले आहेत. सूत्रांच्या मते, हा आदेश अलीकडेच जारी करण्यात आला आहे. हा खटला अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) शी संबंधित एका कथित बँक फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. अॅबोड पाली हिलमध्ये आहे. “अॅबोड” नावाची ही आलिशान इमारत मुंबईच्या पाली हिल परिसरात आहे.
