आता ‘लाडकी विहीण योजनेची’ सर्वांना आतुरता
संपदा सावंत
मुंबई: राज्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सर्वपरिचित असतानाच आता ‘लाडकी विहीण योजना’ नावाने एक वेगळीच चर्चा रंगली आहे. मात्र ही कोणतीही शासकीय योजना नसून, मराठी रसिकांसाठी खास मनोरंजनाची पर्वणी आहे.
नावात ‘योजना’ असली तरी यामध्ये कोणतीही कागदपत्रे, अटी-शर्ती किंवा शासकीय प्रक्रिया नाही. उलट खुसखुशीत विनोद, मिश्किल संवाद आणि मराठी कुटुंबातील दैनंदिन आयुष्यातील गंमती-जमतींचं जिवंत चित्रण यातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कौटुंबिक वास्तवावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करत ही कलाकृती ताणतणावातून क्षणभर विरंगुळा देणार आहे.
सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रंगभूमीवर ‘लाडकी विहीण योजना’ घेऊन येत आहेत. “प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, तर तोच माझा खरा लाभ,” असे मत त्यांनी व्यक्त केले. चित्रपटांच्या व्यस्त वेळापत्रकातून पुन्हा रंगभूमीवर परतण्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
अष्टविनायक एंटरटेनमेंट आणि पंचशील एंटरटेनमेंट निर्मित या नाटकाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांनी केले असून दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे.
कलाकार आणि तंत्रज्ञ यांची उत्तम भट्टी जुळल्यामुळे ‘लाडकी विहीण योजना’ प्रेक्षकांना नक्कीच आनंद देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ही ‘मनोरंजन योजना’ लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, मराठी नाट्यप्रेमींसाठी हसण्याचा नवा डोस घेऊन येत आहे.
