घोडबंदर रोडवरील तीव्र पाणीटंचाईमुळे नव्या बांधकामांना परवानगी बंद करावी
भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांची मागणी
ठाणे: घोडबंदर रोडवरील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सध्या राहणाऱ्या नागरिकांच्या हितासाठी महापालिकेकडून नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. पाणीटंचाईमुळे त्रस्त नागरिकांचा उद्रेक होण्याची दाट शक्यता वाटत असल्याने महापालिकेने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी मनोहर डुंबरे यांनी केली.
घोडबंदर रोड भागाची लोकसंख्या किमान चार ते पाच लाखांपर्यंत पोचली आहे. या भागाचा समावेश असलेल्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या माध्यमातून ठाणे शहरातील सर्वाधिक मालमत्ता कर वसूल केला जातो. परंतु, त्या तुलनेत महापालिकेकडून नागरी सुविधा मिळत नसल्याची नागरिकांकडून सातत्याने तक्रार केली जात आहे, असे मनोहर डुंबरे यांनी पत्रात म्हटले आहे.
घोडबंदर रोड परिसरात सर्वात मोठी समस्या ही अपुऱ्या पाणीपुरवठ्याची आहे. त्यापाठोपाठ वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक व दररोजच्या प्रवाशांचा जीव घुसमटला आहे. घोडबंदर रोडवरील प्रत्येक इमारतीतील नागरिक पाणी पुरेसे येत नसल्यामुळे त्रस्त आहेत. या नागरिकांना नाईलाजाने टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. काही मोठ्या गृहसंकुलांचे महिन्याचे टँकरचे पाणीबिल हे काही लाखांमध्ये पोचते. मात्र, या गृहसंकुलांकडून नियमितपणे पाणीपट्टी वसूल केली जाते, हे दुर्देवी आहे, असे मत नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केले.
या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यावेळी या भागासाठी काही वेळा वाढीव ५० दशलक्ष लिटर, काही वेळा अतिरिक्त १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देऊन प्रशासनाने वेळ मारून नेली. मात्र, आता उन्हाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच घोडबंदर वासियांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर सातत्याने लोकप्रतिनिधींचे पाणीटंचाईकडे लक्ष वेधले जात आहे. पावसाळ्याला अजून तीन महिन्यांचा कालावधी असून, नागरिकांकडून उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे, अशी भीती मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केली.
महापालिकेने भविष्यात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीनियोजन केलेले नाही, हे कटू वास्तव आहे. महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र धरणाचा निर्णयही झालेला नाही. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई राहण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने घोडबंदर रोड परिसरात नव्या एकाही गृहनिर्माण प्रकल्प वा इमारतीला बांधकामासाठी परवानगी देऊ नये. महापालिका सद्यस्थितीत सर्व रहिवाशांना पाणीपुरवठा करू शकत नाही. त्यामुळे नव्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनाही टँकरचे पाणी विकत घ्यावे लागेल. नव्या रहिवाशांची फसवणूक टाळण्यासाठी व जुन्या रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नव्या बांधकामांना बंदी आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *