पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करा
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे प्रशासनाला निर्देश
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामाचा आढावा आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई मार्च अखेरीसपासून हाती घेऊन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत शहरातील रस्ते साफसफाई, कचरा हस्तांतरण केंद्र, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची स्थिती, बांधकाम व पाडकाम कचऱ्याची प्रक्रिया तसेच ‘स्वच्छ ठाणे व्हिजन’ या उपक्रमाची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. शहरातील काही प्रभागांमध्ये सार्वजनिक शौचालयांची नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचे निदर्शनास आणून देत महापौरांनी याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले. शौचालयांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असावे, पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्यावर तत्काळ भरल्या जाव्यात, तसेच दरवाज्यांचे कडी-कोयंडे सुस्थितीत ठेवावेत, यासाठी संबंधित स्वच्छता निरीक्षकांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरी भागात ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात असला तरी झोपडपट्टी भागात हे प्रमाण कमी असल्याचे महापौरांनी नमूद केले. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात दोन सत्रांत रस्त्यांची साफसफाई केली जाते. यासाठी १६५६ सफाई कर्मचारी कार्यरत असून ६ वाहनांच्या माध्यमातून यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता केली जाते. तसेच ओला कचरा प्रकल्प, सुका कचरा प्रकल्प, पूर्वप्रक्रिया केंद्रे आणि बांधकाम व पाडकाम कचऱ्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेची माहितीही यावेळी देण्यात आली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शहरात सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांची नियमित साफसफाई करावी आणि सर्व प्रभागांमध्ये व्यापक नियोजन करावे, अशा सूचनाही महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी या बैठकीत दिल्या.
