भूमी अभिलेख कार्यालयात रजा आंदोलन आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय
अशोक गायकवाड
कर्जत: विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक अर्जित रजा आंदोलन सुरू केल्याने कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. कर्मचारी कार्यालयाबाहेर असहकार आंदोलन करत उभे राहिल्याने सोमवारी सकाळपासून मोजणी, नकाशे, उतारे व इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना निराश होऊन परत जावे लागत आहे . त्यामुळे शेतकरी, बांधकाम व्यावसायिक तसेच सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे. कार्यालयाबाहेर लावलेल्या फलकावर ‘भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती (महाराष्ट्र राज्य)’ यांच्या वतीने आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कर्जत कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. १८ व २० फेब्रुवारी रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून मोजणीची कामे बंद ठेवण्यात आली होती. काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर आता सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास २ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. दरम्यान, काही नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलनावर टीकाही केली.
चौकट :
तांत्रिक वेतन श्रेणीचा प्रश्न २०१२ पासून भूमी अभिलेख विभागातील पदांसाठी तांत्रिक शैक्षणिक अर्हता लागू करण्यात आली असली तरी कर्मचाऱ्यांना अद्याप कारकून संवर्गाप्रमाणेच वेतन मिळत असल्याची तक्रार आहे. या संदर्भातील समितीचा अहवाल शासनाकडे सादर होऊनही निर्णय न झाल्याने असंतोष वाढला असून, आंदोलन तीव्र करण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले. २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक अर्जित रजा टाकून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथील जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कर्जत येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दररोज किमान १४ मोजणी प्रकरणांमध्ये मोजणी प्रक्रिया होत असते परंतू कार्यालयांमध्ये ०७ रोवर मशीन उपलब्ध असल्यामुळे कर्मचारी वेळेवर साईट वर पोहोचू शकत नसल्यामुळे जनतेच्या तक्रारी निर्माण होतात त्यामुळे कर्जत कार्यालयास उपलब्ध भूकरमापक यांच्या संख्यानुसार रोवर मशीन मेळाव्यात तसेच लॅपटॉप देखील मिळावेत.
—शैलेश जाधव – शिरस्तेदार, कर्जत भूमिअभिलेख कार्यालय
