नवी दिल्ली : “आजच्या भारतात शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवणे हा सर्वात मोठा ‘गुन्हा’ बनला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला अशा दिशेने ढकलले जात आहे, जिथे प्रश्न विचारणे हा कट मानला जातो आणि मतभेद व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह, मोदीजी हा उत्तर कोरिया नाही जेते हुकुमशाही आहे. हा भारत आहे. “

अशा तीव्र शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे.

दिल्लीत एआय समिटमध्ये युवक काँग्रेसच्या आंदोलकांविरोधात गुन्हे नोंदवल्यानंतर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.  राहुल गांधी यांनी थेट इशारा दिला आहे की, संवैधानिक मार्गाने आवाज उठवणाऱ्यांना आज तुरुंगवास आणि खटल्यांना सामोरे जावे लागत आहे. एका “तडजोड केलेल्या” पंतप्रधानांच्या राजवटीत जनतेची गैरसोय टाळण्यासाठी न्यायाची मागणी फेटाळून लावली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तरुणांपासून कुस्तीगीरांपर्यंत, सर्वांचाच आवाज दाबला!

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना विविध आंदोलनांचा उल्लेख केला आणि सरकारकडून होणाऱ्या दडपशाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये काही प्रमुख घटनांचा दाखला देत सरकारला धारेवर धरले. राहुल यांनी म्हटलं आहे की, भविष्याची चिंता करणाऱ्या तरुणांनी जेव्हा पेपर लीक प्रकरणावर आवाज उठवला, तेव्हा त्यांना न्यायाऐवजी पोलिसांच्या लाठ्या मिळाल्या. देशाची शान असलेल्या महिला कुस्तीगीरांनी जेव्हा भाजपच्या एका प्रभावी नेत्याविरुद्ध गंभीर आरोपांची चौकशी मागितली, तेव्हा त्यांना न्याय देण्याऐवजी आंदोलनाला बदनाम करण्यात आले आणि त्यांना रस्त्यावरून ओढत नेले गेले.

‘प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का?’

आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना ‘राष्ट्रविरोधी’ ठरवण्यात आले. संवादाऐवजी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या, रबर गोळ्या आणि पाण्याचा मारा करण्यात आला. राहुल गांधी यांनी आदिवासींचे प्रश्न, पर्यावरणीय समस्या आणि युथ काँग्रेसच्या आंदोलनाचाही उल्लेख केला. “जेव्हा आदिवासी जमीन आणि जंगलासाठी लढतात, तेव्हा त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. जेव्हा लोक प्रदूषणाविरुद्ध बोलतात, तेव्हा त्याला ‘राजकारण’ ठरवून दाबले जाते. ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे जिथे पंतप्रधान प्रश्नांना घाबरतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *