शहापूर तालुका टँकरमुक्त कधी होणार ?
शहापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे सावट
अविनाश उबाळे
ठाणे : ठाणे,मुंबईसारख्या महानगरातील करोडो जनतेची तहान भागविणाऱ्या शहापूर तालुक्यात दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यात भीषण अशी पाणी टंचाई सुरू होते.घरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था शहापूर तालुक्यातील जनतेची आहे.शहापूर तालुक्यात जलजीवन मिशनची एकूण १९४ कामे मंजूर आहेत मात्र यातील २१ कामे आजमितीला पूर्ण झाली असून जवळपास १७३ जलजीवन मिशनची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच भावली पाणी योजनेचे कामही संथ गतीने सुरू असल्याने भावली पाणीपुरवठा योजनेची प्रतिक्षा लोकांना करावी लागणार आहे.शहापूरला यंदा पुन्हा टँकरवरच अवलंबून राहावे लागणार आहे.अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे.
शहापूर हा धरणांचा तालुका कायम पाणी टंचाईच्या विळख्यात सापडतो.हा तालुका टँकरमुक्त तरी कधी होणार ? हा प्रश्न कायम अनुत्तरीतच आहे.मुंबई महानगरापासून अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे उपनगराजवळील शहापूर, आसनगाव,कसारा या शहरालगत असलेल्या आदिवासी गाव पाड्यांवर दरवर्षी पाणी टंचाईने नागरिकांचे भयंकर हाल होतात.भातसा,तानसा, मोडकसागर,मध्य वैतरणा ही प्रचंड जलसाठे असलेली सर्वात मोठी चार धरणं शहापूर तालुक्यात असतानाही या जलाशयातील एक हंडाभर पाणीही स्थानिकांना मिळत नाही,हे सारं धरणातील पाणी आदिवासीच्या डोळ्यादेखत जलवाहिन्यांतून थेट मुंबईकरांना पुरवले जाते.धरणालगत राहणाऱ्या स्थानिक आदिवासींना मात्र दरवर्षी पाणी टचाईच्या त्रासाचा सामना करावा लागतो.नदी,ओव्हळ,विहिरी उन्हाळ्यात आटत असल्याने येथे पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न उभा राहतो.मग पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी स्थानिक आदिवासी महिला पाण्याच्या शोधात रानोरान भटकंती करतात,उन्हाळ्यात गाव पांडयांना दरवर्षी भीषण पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागते.शहापूर तालुक्यातील कित्येक पाणीपुरवठा योजना नादुरुस्त अवस्थेत दिसतात.तर बहुतांश पाणी योजनांचे विद्युत बिल थकल्याने बंद पडून आहेत.दरवर्षी पाणी टंचाईची ओरड सुरू झाल्यावर उन्हाळ्यात तातडीची उपाययोजना म्हणून स्थानिक पंचायत समिती प्रशासन आणि ठाणे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठो टंचाई कृती आराखडा तयार केला जातो व यासाठी टेंडर काढले जातात आदिवासी वाड्या-वस्त्यांवर बैलगाडी आणि टँकरने पाणी पोहचवण्यासाठी करोडो रुपयांचा सरकारी खर्च केला जातो.केवळ ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या युक्तिप्रमाणे नेहमीच येते मग पाणी टंचाई याप्रमाणे गेली अनेक वर्ष स्थानिक प्रशासन टँकरने पाणी पुरवण्याच्या नावाखाली वारेमाप सरकारी खर्च करत आहे.येत्या दहा वर्षांत दहा कोटीहून अधिक असा खर्च केवळ तालुक्यातील गाव खेड्यांवर टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी झालेला दिसतो आहे.पाणी टंचाईची समस्या मात्र कायमची सोडवण्यासाठी आजतागायत ठोस अशा उपाययोजना झालेल्या दिसून येत नाहीत. .परिणामी,पिण्याच्या पाण्याचा संघर्ष हा दरवर्षी स्थानिक आदिवासींना करावा लागत आहे.पाणी टंचाई गाव पाड्यांना दिलासा मिळेल अशी जलजीवन मिशनची कामे कासवगतीने सूरु असल्याने ही कामे पुर्ण होण्याची प्रतिक्षा पुढील काही वर्षे स्थानिक लोकांना करावी लागणार आहे. -संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार
यंदाही शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई वर उपाययोजना करण्यासाठी एकूण १७ कोटी २९ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेला संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा मंजूरी झाला आहे.या कृती आराखड्यात नवीन विंधन विहीर बांधणे,विंधन विहिरींची दुरुस्ती करणे,पूरक नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती करणे,नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्ती करणे या कामांचा समावेश आहे.तसेच यामध्ये विशेष म्हणजे एकूण ३४४ गाव पाड्यांवर टँकर व बैलगाड्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तरतूद करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्या वर्षी ४३ गावे व १५५ पाड्यांवर ४२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात येत आहे.
