सावंतवाडी: मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-पॅक्स जलवाहतूक सेवेचा आज थाटात शुभारंभ झाला आणि चाकरमनी अवघ्या ६ तासात मुंबईतून कोकणात इलो.
मुंबईतील भाऊचा धक्का येथून मंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या सेवेची पहिली फेरी कोकणच्या दिशेने रवाना झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनातून साकार झालेली ही सेवा कोकण आणि मुंबईतील दुवा अधिक मजबूत करणारी ठरणार आहे.
ही रो-पॅक्स सेवा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. सुमारे ६२५ प्रवासी क्षमता असलेल्या या बोटीतून एकाच वेळी ४० चारचाकी आणि २५ दुचाकी वाहने वाहून नेली जाऊ शकतात. मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर आता अवघ्या ६ तासांत पूर्ण होणार असल्याने प्रवाशांच्या वेळेत आणि श्रमात मोठी बचत होणार आहे. बोटीमध्ये आरामदायी आसनव्यवस्था, आधुनिक नेव्हिगेशन प्रणाली आणि सुरक्षा उपकरणांची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
