आझाद मैदानातील उपोषण दरम्यान पोलीस आयुक्तांना निवेदन
रमेश औताडे
मुंबई : बहुजन क्रांती सेनेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष लीनाताई अहिर यांनी आझाद मैदानात २१ जानेवारी पासून सुरू केलेले बेमुदत उपोषण अद्याप सुरू केले आहे. कथित अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी बंदी घालावी यासाठी त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन दिले. मागणी मान्य नाही झाली तर आंदोलन तीव्र करू असा इशारा त्यांनी दिला आहे. कल्याण शहरातील महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी बंदी घालावी, संबंधित चालक व जागा मालकांविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करावेत आणि परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी लीनाताई अहिर यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात अवैध धंद्यांमुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी निवेदन स्वीकारून महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. लीनाताई अहिर यांनी प्रशासनाला ठोस कारवाईसाठी निश्चित कालमर्यादा द्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक नागरिक आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
