मुंबई : कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई- गोवा मार्ग आता पुढील ३ महिन्यात पुर्ण करणार असल्याचे चॅलेंज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्विकारले आहे.
माणगाव व इंदापूर बायपासचा अपवाद वगळता उर्वरित कामे मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिली.
आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. समृद्धी महामार्ग झाला पण मुंबई-गोवा महामार्ग रखडला. यामुळे होळी, गणेशोत्सव काळात कोकणवासीयांना प्रंचड यातना सहन कराव्या लागतात. याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. तर, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रकल्प रखडल्याचा मुद्दा मांडत काम पूर्ण होण्याबाबत वेळापत्रक देण्याची मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.
