क्रीडा स्वास्थ्य आणि समाजसेवा यांचा संगम
कल्याण : मॅरेथॉन विश्वात आपल्या शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट आयोजनाने देशभर नाव कमावणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील ‘रनर्स क्लॅन फाऊंडेशन’ने आपल्या ‘क्रीडा स्वास्थ्य एवं समाजसेवा’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत एका सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले. मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या जि.प. शाळा, वाडी (शिवमंदिर) या दुर्गम भागातील शाळेला फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणिक व क्रीडा साहित्याची मदत देण्यात आली.
फाऊंडेशनच्या सदस्यांनी या शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर आणि कवायती सादर करत सदस्यांचे जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्थानिक भागातील उपलब्ध पाना-फुलांपासून स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ पाहुण्यांना देऊन त्यांचे स्वागत केले, ज्यामुळे उपस्थित सदस्य भारावून गेले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कलाविष्कार शहरातून आपल्याला कोणीतरी भेटायला आले आहे, या भावनेने भारावलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी गाणी आणि नृत्यांचे सादरीकरण केले.
