राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त
भारतीय इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
कल्याण : कल्याण पश्चिम येथील गौरीपाडा परिसरातील भारतीय इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोगांचे आकर्षक प्रदर्शन आयोजित केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थापक प्रभाकर जाधव आणि मुख्याध्यापिका सोनाली धाकराव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विज्ञान प्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडले.
या प्रदर्शनात एकूण ४८ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संरक्षण, अंतराळ विज्ञान, रोबोटिक्स तसेच दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयांवर प्रात्यक्षिके सादर करून आपली गुणवत्ता दाखवून दिली. कार्यक्रमास इतर विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रयोग पाहून त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रसंगी मुख्याध्यापिका सोनाली धाकराव यांच्यासह शिक्षिका वैशाली दळवी, जयंश्री वानी, अर्चना अर्कल, प्रीती गौड, पल्लवी जायसवाल, कविता घेवादे तसेच शिक्षक राजेश परमार, संगीता सिंह आणि प्रणाली काळे उपस्थित होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड आणि जिज्ञासा अधिक वाढली आहे. अशा उपक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वासही बळकट होतो, असे मत व्यक्त करण्यात आले.
