विज्ञान, वाणिज्य शाखेसाठीही लवकरच मराठीतून पुस्तके

विश्व मराठी संमलेनातील परिसंवादात दावा

हरिभाऊ लाखे

नाशिक : राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत मातृभाषेतील ज्ञानाने आत्मविश्वास विकसित करणे तसेच मातृभाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे. शिक्षणाचे मूळ संस्कृतीत आहे. लवकरच पदवीसाठी विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पुस्तके मराठीत आणण्यात येणार असल्याची माहिती अभ्यासक्रमातील मराठी भाषा या विषयावरील परिसंवादात देण्यात आली.

येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या आवारात आयोजित विश्व मराठी संमेलनात परिसंवाद झाला. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणककर , कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी परिसंवादात सहभाग घेतला. डॉ. देवळाणकर यांनी, शिक्षणाचे महत्व कमी होत असल्याचे सांगितले. शुल्क किंवा अन्य गोष्टींवर चर्चा होत असतांना परदेशात मात्र शिक्षण आणि शिक्षकाला महत्व आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे मातृभाषेला महत्व देण्यावर भर दिला जात असल्याचे नमूद केले. डॉ. सोनवणे यांनी अभ्यासक्रम आणि मराठी या गोष्टींचा विचार करायला हवा. मराठी भाषा आत्मविश्वास निर्माण करते. भाषेमध्ये आपण आशयाचा आधार घेतो. मराठी समृद्धीसाठी भाषा समकेंद्री , शब्द संपदा, व्याकरण यांचा विचार व्हायला हवा. मराठी भाषा तंत्रस्नेही होणे आवश्यक असल्याचे मांडले.

डॉ.आवलगावकर यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी शैक्षणिक पातळीवर भाषेचा व्यापार, व्यवहार यामध्ये कितपत उपयोग होतो, हे पाहणे गरजेचे असल्याचे मांडले. शैक्षणिक पातळीवर या अनुषंगाने विविध अभ्यासक्रम मराठीत तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये उच्चारण आणि लेखन यावर भर देणे आवश्यक आहे. भाषेशी असणारी आपली नाळ तुटता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी, असे त्यांनी सांगितले. डॉ. कुलकर्णी यांनी शब्दकोशाच्या बाबतीत आपल्याकडे फारसे काम झाले नसल्याची खंत व्यक्त केली. डॉ. गोसावी यांनी कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत येत असून पुढील वर्षापासून ती मिळतील. विज्ञान आणि भाषा एकत्र आणण्याचे काम होणे गरजेचे आहे. बोलीभाषाही तितकीच महत्वाची असल्याचे मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *