व्ह्यूज पेपर : वर्तमानपत्राच्या ओळींच्या आडून उलगडणारा कलाप्रवास

राजेंद्र साळसकर

मुंबई : वर्तमानपत्र हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून ते एक कला कॅनव्हास ठरू शकते, याची प्रचिती व्यंगचित्रकार, लेखक, कवी आणि अमूर्त कलावंत प्रदीप म्हापसेकर यांच्या ‘व्ह्यूजपेपर’ या अनोख्या प्रदर्शनातून येणार आहे. बुधवार, ४ मार्च ते सोमवार, ९ मार्च २०२६ या कालावधीत फोर्ट येथील आर्टिस्ट सेंटर येथे हे प्रदर्शन भरत असून, सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांसाठी खुले राहणार आहे.

दैनिक वर्तमानपत्रातील अक्षरांच्या रेषा, मथळे, ओळी आणि रिकाम्या जागा यांना अमूर्त कलारूप देत म्हापसेकर यांनी एक वेगळी दृश्यभाषा साकारली आहे. काळा-पांढरा, लाल, पिवळा अशा रंगछटांसह काही ठिकाणी सोन्याची झळाळी वापरून अक्षरांमधील आशयाला नवे आयाम दिले आहेत. ओळींच्या आड दडलेली न सांगितलेली कथा, न वाचलेली जागा आणि त्यातून उलगडणारा जीवनानुभव हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरत आहे.

म्हापसेकर यांची कला केवळ दृश्य आनंद देत नाही, तर ती प्रेक्षकांशी थेट संवाद साधते. प्रत्येक रेषा, ठिपका आणि रंगसंगतीतून जीवनातील आनंद-वेदना, थांबे आणि प्रवास यांची जाणीव करून देणारा हा अनुभव ठरणार आहे. दररोज दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत कलाकाराशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधीही रसिकांना उपलब्ध होणार आहे. हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलेरी समोर, आर्मी नेव्ही बिल्डिंगच्या तळमजल्यावर भरत असून, कला रसिकांनी या अनोख्या ‘व्ह्यूजपेपर’चा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रदीप म्हापसेकर यांच्याशी ९८२०८८६६७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *